
आधी Ertiga आणि Innova कारने घेरलं, मग टाकला दरोडा! मुंबई-आग्रा महामार्गावर 3 कोटींची लूट; दिवाळीच्या तोंडावर दरोडेखोरांचा धुमाकूळ
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल दरोड्याची थरारक घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातील पळसनेरजवळ कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कार अडवून दरोडेखोरांनी तब्बल 3 कोटी 6 लाख 10 हजार रुपयांची रोकड लुटली आहे. दोन वाहनांमधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी लोखंडी पाईपने कारच्या काचा फोडत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांचे अपहरण करून अज्ञातस्थळी नेत रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली.
सुरत येथील एका कुरिअर कंपनीची रोकड घेऊन कार मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होती. याचवेळी पळसनेरजवळ पांढऱ्या रंगाची अर्टिगा आणि दिल्ली पासिंगची इनोव्हा अशा दोन वाहनांमधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर कर्मचाऱ्यांची कार अडवली. हातातील लोखंडी पाईपने कारच्या काचा फोडत सुनील पटेल आणि शैलेशभाई पटेल या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवून अज्ञातस्थळी नेण्यात आले. तिथे त्यांच्या ताब्यातील 3 कोटी 6 लाख 10 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कचरे या प्रकरणाचा तपास करत असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.




