
रत्नागिरीच्या सुपुत्रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक भरारी: डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी फत्ते केली आव्हानात्मक ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’
रत्नागिरी, दि. ३ ): कणखर निर्धार, अफाट शारीरिक क्षमता आणि पोलादी इच्छाशक्तीच्या जोरावर रत्नागिरी सायकलिंग क्लब व निश्चयः वेलनेस चे संस्थापक डॉ. नितीन सनगर आणि आरसीसी व निश्चयः चे सदस्य राहुल भोसले यांनी जागतिक स्तरावरील ट्रायथलाॕन मध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन एशिया समितीच्या अंतर्गत आयोजित आणि जगातील सर्वात खडतर व आव्हानात्मक एकदिवसीय ट्रायथलॉन मानली जाणारी ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ ही स्पर्धा या दोघांनी केवळ ७ तास २ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत अप्रतिम यश संपादन केले.
या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलाॕनमध्ये जगभरातील ६८ देशांमधून तब्बल ३,५०० हून अधिक नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. समुद्राच्या उसळत्या लाटांवर मात करत १.९ किमी ओपन वॉटर स्विमिंग, तीव्र चढ-उतारांच्या व खडतर मार्गांवर ९० किमी सायकलिंग आणि दमछाक करणाऱ्या कोस्टल रस्त्यांवर २१.१ किमी हाफ मॅरेथॉन धावणे, असे या स्पर्धेचे अतिशय कठोर स्वरूप होते. किंचितशीही चूक ‘पेनल्टी’ किंवा ‘डीएनएफ’ (डीड नॉट फिनिश) ठरवणाऱ्या या स्पर्धेत या दोन्ही धाडसी खेळाडूंनी अचूक नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हे सर्व अंतर ७ तास २ मिनिटांत पार पाडून नवा आदर्श निर्माण केला.
विक्रमी कामगिरीची परंपरा
*डॉ. नितीन सनगर: यांची ही चौथी ट्रायथलॉन, ७०.३ फॉरमॅटमधील तिसरी आणि अधिकृत ‘आयर्नमॅन’ म्हणून पहिलीच स्पर्धा ठरली. यापूर्वी त्यांनी सुपर रँडोनियर (२००, ३००, ४०० आणि ६०० किमी) सायकलिंगचे कठीण टप्पे पूर्ण केले आहेत. सलग तीन वर्षे ‘टाटा फूल मॅरेथॉन’ आणि सलग तीन वर्षे ‘सातारा हिल मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या डॉ. सनगर यांनी नुकतेच सातारा हिल मॅरेथॉनमध्ये ‘सब २’ वेळेसह सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांना कोल्हापूर येथील ‘अर्हता’चे पंकज राउळू यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.
*राहुल भोसले: यांनी यापूर्वी दुबईच्या खोल समुद्रातील १० किमी ‘ओशन मॅन’ ओपन वॉटर स्विमिंग, ‘लोह पुरुष’ मालवण येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा यांसह अनेक मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोवा आयर्नमॅन ७०.३ च्या तयारीसाठी त्यांनी डॉ. नितीन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता.
शारीरिक आणि मानसिक क्षमतेची पराकाष्ठा पाहणाऱ्या या जागतिक दर्जाच्या महाकठीण स्पर्धेत यश मिळवून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे.



