
आर्ट सर्कल फाउंडेशनच्या २० व्या भव्य संगीत महोत्सवाचे २२, २३ व २४ जानेवारी रोजी आयोजन
दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार स्वर-तालाची मैफल*
रत्नागिरी : रत्नागिरीतील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था ‘आर्ट सर्कल फाउंडेशन’च्या वतीने यंदा २० वा कला संगीत महोत्सव मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. ऐतिहासिक थिबा पॅलेसच्या निसर्गरम्य आणि भव्य प्रांगणात २२, २३ आणि २४ जानेवारी २०२७ रोजी हा तीन दिवसीय संगीत सोहळा पार पडणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ, श्रेष्ठ तसेच आघाडीच्या युवा कलाकारांची मांदियाळी या महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीत एकत्र येणार असून, तीनही दिवस रसिकांना गायन, वादन आणि जुगलबंदीची अनोखी अनुभूती घेता येणार आहे.
महोत्सवाचा शुभारंभ २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. पहिल्या सत्रात आणि डॉ.स्वीकार कट्टी (सितार), ह्रिषीकेश मजुमदार (बासरी) व रोहित देव (तबला) यांच्यातील रंगतदार जुगलबंदीने महोत्सवाची नांदी होईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात गायिका विदुषी पल्लवी जोशी आणि विदुषी अपूर्वा गोखले यांचे सुश्राव्य शास्त्रीय सहगायन सादर होणार आहे. या मैफलीत त्यांना संवादिनीवर अनंत जोशी तर तबल्यावर स्वप्नील भिसे साथसंगत करतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २३ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य विनय देसाई यांचे संतूर वादन रंगणार आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पंडित अनुब्रत चॅटर्जी तबला साथ करणार आहेत. दुसऱ्या सत्रात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्या शास्त्रीय गायनाची बैठक सजणार असून, त्यांना संवादिनीवर ज्येष्ठ संवादिनी वादक अजय जोगळेकर आणि तबल्यावर अथर्व आठले यांची साथ लाभणार आहे.
महोत्सवाचा तिसरा व अंतिम दिवस २४ जानेवारी रोजी संपन्न होईल. या दिवशी पहिल्या सत्रात शास्त्रीय संगीतातील आघाडीचे युवा गायक अनिरुद्ध एथल यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर वरद सोहोनी आणि तबल्यावर विवेक पंड्या साथ करतील. या ऐतिहासिक विसाव्या महोत्सवाचा समारोप दुसऱ्या सत्रात जागतिक ख्यातीचे तबला महर्षी पंडित अनिंदो चटर्जी यांच्या प्रतिष्ठित अशा एकल तबला वादनाने होणार आहे. त्यांना संवादिनीवर ज्येष्ठ वादक अजय जोगळेकर लेहरा साथ देतील.
आर्ट सर्कल फाउंडेशनच्या या संगीत महोत्सवाच्या रूपाने रत्नागिरीकरांना अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध ठेवा अनुभवण्याचा आनंद दरवर्षी मिळतो. संगीतप्रेमी व जाणकार रसिकांनी या महोत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.




