
डोहात अडकलेल्या रानगव्याला वनविभागाकडून जीवदानग्रामस्थांच्या मदतीने चिपळूण तालुक्यात यशस्वी बचाव मोहीम
चिपळूण तालुक्यातील ओवळी सुकविलवाडी येथे ४ ते ५ फूट खोल नैसर्गिक डोहात अडकलेल्या रानगव्याची वनविभागाने सुरक्षित सुटका केली. ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेनंतर रानगव्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.
ओवळी येथील ग्रामस्थ लक्ष्मण झोरे हे सोमवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी गेले असता, सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक डोहात एक रानगवा अडकलेला दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती गावचे पोलीस पाटील अजिंक्य शिंदे यांना दिली. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वस्तीपासून दूर असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पथकाला सुमारे दीड तास पायी जावे लागले. रानगवा डोहात अर्धवट बुडालेल्या अवस्थेत असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी डोहात दगड टाकून उंची वाढविण्याची योजना राबविण्यात आली.
डोहाभोवतीचे दगड जमा करून सुरक्षित अंतरावरून ते डोहात टाकण्यात आले. त्यामुळे रानगव्याला बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार झाला. या मार्गाने रानगवा सुखरूप बाहेर पडत जंगलाच्या दिशेने निघून गेला. अंदाजे ६ ते ७ वर्षे वयाचा हा पूर्ण वाढ झालेला नर रानगवा असल्याचे वनविभागाने सांगितले.
ही मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई-पाटील व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये परिक्षेत्र वनाधिकारी एस. एस. खान, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, वाहनचालक नंदकुमार कदम, अजय बडदे तसेच पोलीस पाटील अजिंक्य शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप शिंदे आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.




