‘लँड टायटलिंग ॲक्ट’ची राज्यात जुलैपासून अंमलबजावणी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती!!

Land Titling Act Maharashtra : ‘राज्यात येत्या जुलै महिन्यापासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालमत्तांना कायदेशीर संरक्षण मिळणार असून, जगात कुठेही बसूनही मालमत्तांचे व्यवहार करणे सुलभ होणार आहे,’ अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे दिली. भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर बावकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून, त्यामुळे जमीन आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये मोठा बदल घडेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कायद्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, येत्या जुलैमध्ये तो लागू करण्यात येईल. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालमत्तेची अधिकृत आणि निश्चित नोंदी तयार होतील.

सध्या अनेक ठिकाणी जमिनीच्या मालकीवरून वाद, दुबार विक्री, बनावट कागदपत्रे किंवा वारसाहक्काचे प्रश्न निर्माण होतात. मात्र, ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू झाल्यानंतर प्रत्येक मालमत्तेची अधिकृत डिजिटल ओळख मिळणार असून, त्या मालमत्तेचा मालक कोण, त्याचे हक्क काय, त्यावरील व्यवहार कोणते याची स्पष्ट आणि कायदेशीर नोंद राहणार आहे,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘ राज्यातील जमीन अभिलेख आणि मालमत्ता नोंदी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आणण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मालमत्ता व्यवस्थापन जागतिक स्तरावरील प्रणालीशी जोडले जाईल. मालमत्ता व्यवहारातील पारदर्शकता वाढल्याने बँकिंग, उद्योग आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल, परदेशात किंवा देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांनाही जगात कुठेही बसून आपल्या मालमत्तेची माहिती पाहणे, व्यवहार करणे किंवा पडताळणी करणे शक्य होईल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button