खेड तालुक्यात भात कापणीच्या कामांना वेग; शेतकरी शिवारात व्यस्त

अवकाळी हवामान आणि पावसाच्या अनियमिततेचा उत्पादनाला फटका; मजूरटंचाई व वाढत्या इंधनदरांमुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

खेड : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि बदलत्या हवामानाचा परिणाम भातशेतीवर झाल्याने खेड तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत आहे. भात पिकाच्या उत्पादनात घट झाल्याचे चित्र दिसत असतानाच, हाती आलेले पीक वाया जाऊ नये आणि जे काही उत्पादन पदरात पडेल ते सुरक्षितपणे घरात आणता यावे, या उद्देशाने शेतकऱ्यांनी भात कापणीच्या कामांना वेग दिला आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र शेतशिवारात भात कापणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा पावसाची अनियमितता आणि बदलत्या हवामानामुळे भात पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा कमी झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अशा परिस्थितीत पिकाची आणखी वाट न पाहता उपलब्ध झालेले भात वेळेत कापून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. नुकसान अधिक वाढण्यापूर्वी शेतातील पीक सुरक्षित करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
भात कापणीबरोबरच मळणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतातील भात कापून त्याची मळणी करून धान्य घरात आणण्याची लगबग सुरू असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी सध्या पूर्णपणे शेतीच्या कामात गुंतले आहेत. परिणामी, तालुक्यातील बाजारपेठांमध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्येही नागरिकांची वर्दळ तुलनेने कमी झाल्याचे जाणवत आहे. ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहारांवरही शेतीच्या हंगामी कामांचा परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, भात कापणीसाठी आवश्यक असलेल्या मजुरांची टंचाई शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण ठरत आहे. वेळेत मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना स्वतःच कुटुंबीयांच्या मदतीने भात कापणीची कामे करावी लागत आहेत. त्यातच यंत्रसामग्री वापरण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यांत्रिक पद्धतीने कापणी व मळणी करणेही खर्चिक ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने कामे करण्यास प्राधान्य देत आहेत.
एकीकडे भात उत्पादनातील घट, दुसरीकडे मजुरांची अनुपलब्धता आणि वाढता शेती खर्च, अशा अनेक अडचणींचा सामना खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तरीही हाती आलेले पीक सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी शेतकरी सध्या शिवारात घाम गाळत असून, तालुक्यात भात कापणी आणि मळणीच्या कामांची धामधूम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button