
अल्पसंख्याक उमेदवारांसाठी निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; प्रशिक्षण संस्थांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
रत्नागिरी, दि. १९ ) : अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी ‘निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले असून, संस्थेने आपले अर्ज दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी निवास यादव यांनी केले आहे.
राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजांतील उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीच्या लेखी व शारीरिक चाचणी परीक्षेसाठी सज्ज करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप व निधी
- कालावधी व विषय: किमान २५ ते कमाल ५० उमेदवारांना तीन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा आणि शारीरिक क्षमता या विषयांचे सखोल मार्गदर्शन केले जाईल.
- १२ लाखांहून अधिक अनुदान: निवड झालेल्या संस्थेला ५० प्रशिक्षणार्थींच्या निवास, भोजन, अभ्यास साहित्य, गणवेश आणि प्रशिक्षणासाठी एकूण १२ लाख २ हजार ५०० रुपयांचे अनुदान तीन टप्प्यांत (सुरुवातीला ५०%, दोन महिन्यांनी २५% आणि उमेदवार प्रत्यक्ष भरती परीक्षेस बसल्याचा पुरावा दिल्यानंतर उर्वरित २५%) दिले जाईल.
प्रशिक्षण संस्थांसाठी आवश्यक पात्रता - संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी आणि तिला किमान ५ वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव असावा.
- संबंधित विषयांसाठी अनुभवी प्राध्यापक व शारीरिक प्रशिक्षणासाठी बी.पी.एड. (B.P.Ed.) पदवीधारक प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
- ५० उमेदवारांसाठी पुरेशा वर्गखोल्या, ग्रंथालय, खेळाचे मैदान, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि भोजन-निवासाची सोय असावी. महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, स्वच्छतागृह आणि सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
अर्ज कुठे व कसा करावा?
इच्छुक संस्थांनी शासन निर्णय दि. १७ डिसेंबर २०२१ मधील ‘नमुना-अ’ प्रमाणे संस्थेच्या लेटरहेडवर टंकलिखित केलेला अर्ज सीलबंद लखोट्यात सादर करावा. लखोट्यावर ठळक अक्षरांत ‘पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज’ असे नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी दाखला, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, प्रशिक्षकांची माहिती आणि सुविधांबाबतची सर्व कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मुदतीत जमा करावेत.




