
दाऊद कुठे आहे, सध्या काय करतो?; डी गँग नेटवर्कमध्ये घुसलेल्या FBI एजंटचा सर्वात मोठा खुलासा!
Dwood Ibrahim Dead or Alive : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं सध्याचं लोकेशन आणि त्याच्या नेटवर्कबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. अमेरिकन तपास यंत्रणा FBI साठी काम करणारे मूळ पाकिस्तानी अमेरिकन नागरिक कामरान फरीदी यांनी दाऊद लपलेल्याचे ठिकाण, त्याची सुरक्षा आणि इतर नेटवर्क संबंधित खळबळजनक रहस्य उलगडले आहेत.
कामरान यांनी दाऊद पाकिस्तानातच असल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच २०१८ मध्ये त्याच्या तीन अड्ड्यांच्या आणि दाऊदचा जवळचा साथीदार जब्बार मोतीवाला याच्या अटकेत आपली भूमिका असल्याचेही त्याने कबूल केले आहे. कामरान यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर कबूल केले की, २०१८ साली लंडनमध्ये दाऊदचं आर्थिक नेटवर्क सांभाळणारा पाकिस्तानी नागरिक जब्बार मोतीवाला याला त्यांनीच अटक केली होती. हे FBI चं स्पेशल ऑपरेशन होते, ज्याचा उद्देश जब्बारला अमेरिकेत हद्दपार करणे आणि दाऊद व दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा यांच्यातील आर्थिक संबंध सिद्ध करणे हा होता.
ISI सोबत मिळून काम करतोय दाऊद
अमेरिकन न्यायालयात जब्बारची साक्ष आवश्यक होती परंतु तो फितूर झाला. याचा फायदा घेऊन दाऊद जब्बार मोतीवालाला पाकिस्तानात परत आणण्यात यशस्वी झाला. जब्बारचे कुटुंब पाकिस्तानात राहते आणि जर त्याने साक्ष दिली तर दाऊद आयएसआयसोबत संगनमत करून त्याच्या कुटुंबाला हानी पोहोचवू शकत होता असं कामरान यांनी म्हटलं. जेव्हा कामरान त्यांच्या अमेरिकन पत्नीसोबत पाकिस्तानला गेले होते. तेव्हा दाऊद आणि जब्बारने ISI च्या मदतीने त्यांना अटक करून महिनाभर जेलमध्ये ठेवले होते. अमेरिकन नागरिकता असल्याने कामरान यांचा जीव वाचला. सध्या ते पत्नीसह थायलँडला राहतात.
लाचार वृद्ध नाही तर पूर्णपणे एक्टिव्ह आहे दाऊद
दाऊद आजही पाकिस्तानात सक्रीय आहे. त्यांचा दावा आहे की, धुरंधरमध्ये दाऊदला लाचार आणि वृद्ध दाखवले ते बनावट आहे. दाऊद आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत लग्न करतो. तो दिखाव्यासाठी स्वत:ला धार्मिक म्हणवतो परंतु तो अय्याश, मुजऱ्याचा शौकिन आहे. कामरान स्वत: दाऊदसोबत अनेक पार्टीत सहभागी झालेत. दाऊद कोकीनचं व्यवसाय करतो, त्याची कंपनी भारत-पाकिस्तानात ड्रग्सचा व्यवसाय करते असं कामरान यांनी दावा केला.
दरम्यान, दाऊद कराचीच्या रस्त्यावर दिवसा निघत नाही, नेहमी रात्री बाहेर पडतो. भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असताना त्याचे ठिकाण तातडीने बदलण्यात आले. दाऊद आणि छोटा शकीलजवळ दुबईहून मागवलेल्या बुलेटप्रूफ गाड्या आहेत. दाऊदला पाकिस्तानी सैन्य SSG कमांडो सुरक्षा देते. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी छोटा शकीलकडे असते. शकील दर शुक्रवारी ISI मुख्यालयात जात सुरक्षेचा रिपोर्ट देतो. दाऊदने एकदा रात्री आसिफ अली जरदारीला फोन लावून त्यांचे काम केले होते.
‘इस्लाम बाबा’च्या इशाऱ्यावर दाऊद करतो काम
दाऊद मुंबईहून इस्लाम बाबा नावाच्या फकिराला पाकिस्तानात घेऊन गेला होता. ज्याच्या परवानगीशिवाय दाऊद आणि त्याचे नेटवर्क कुठलेही काम करत नाही. १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटातील सूत्रधार टायगर मेमनही पाकिस्तानात राहून आपला धंदा करत आहे. परंतु दाऊद आणि शकील त्याला जास्त महत्त्व देत नाही.
दरम्यान, दाऊदचे अनेक भूमिगत अड्डे आहेत जिथे मुजराचे कार्यक्रम होतात. एक नाव आहे झमझमा, ही कराचीमधील एक गल्ली आहे, जिचा कोड २२ झमझमा असा आहे. ते एका सामान्य घरासारखे दिसते, त्याच्या खिडक्यांना काच नाही. त्याच्या तळघरात क्लबसारखे वातावरण आहे. ते पूर्णपणे ध्वनिरोधक आहे, तुम्हाला बाहेरून आत काय चाललंय हे कळणारही नाही. तिथे बरेच सुरक्षा रक्षक आहेत. येथे दाऊद एका पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यासोबत बसून मुजरा पाहतो. येथे व्यावसायिक बैठकाही होतात.




