
जिल्हा परिषद शाळांमध्ये १२० नवीन पदांच्या मंजुरीबाबतच्या वृत्तात तथ्य नाही; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
रत्नागिरी, दि. १९ : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १२० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नवीन पदे मंजूर करण्यात आल्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीशी सुसंगत नसून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.*
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ४५ विशेष शिक्षक, २५ कलाशिक्षक, २५ क्रीडा शिक्षक आणि २५ संगणक सहाय्यक अशी एकूण १२० नवीन पदे शासनाने मंजूर केल्याचे नमूद करण्यात आले होते.
शिक्षण विभागाने मांडलेली वस्तुस्थिती
- या पदमंजुरीसंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून अद्याप कोणतेही परिपत्रक किंवा शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला नाही.
- विशेष शिक्षक पदांना मंजुरी देणे किंवा कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक सहाय्यक यांची नवीन पदनिर्मिती करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत.
त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून, पालक, उमेदवार आणि नागरिकांनी या बातमीची नोंद घेताना प्रशासनाने स्पष्ट केलेली ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी केले आहे.




