
शायना एन.सी. यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात ठाकरे शिवसेनेचे अपर जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन
रत्नागिरी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुका पक्षातर्फे आज रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देवून एक अत्यंत गंभीर व संतापजनक निदर्शनास आणून दिली.
निवेदनात अशी मागणी केली आहे की, बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी शिंदेसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांनी हिंदुह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहे.
या संदर्भात शिवसेनेचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नेते नसून, ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. कोट्यवधी शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा व आदर आहे. त्यांचा फोटो फाडणे म्हणजे त्या श्रद्धेचा व भावनांचा अवमान करणे आहे. यामुळे शिवसैनिकांच्या व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर भारतीय न्याय संहिता व इतर लागू कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सूर्यवंशी यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदन देताना उपजिल्हा संघटक सौ. सायली पवार, शहरसंघटक सौ. सेजल बोराटे, विभाग संघटक सौ. श्वेता कोरगांवकर, सोशल मीडिया मेघा कोल्हटकर, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, संदेश भिसे, तन्वीर मुजावर, सुफीयान जयगडकर, शरद राणे, मंदार वारेकर, मनोज कदम उपस्थित होते.




