
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने १५ दिवसांत ६ लाख १८ हजार वृक्षांची विक्रमी लागवड
प्रत्येक भक्त एक वृक्ष" या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, दि. २० : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेल्या “प्रत्येक भक्त एक वृक्ष” या अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. ५ ते १९ जुलै २०२६ या अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत ६,१८,००९ वृक्षांची विक्रमी लागवड करण्यात आली.
देशभरातील हजारो भक्तांनी गाव, शहर, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ तसेच विविध मोकळ्या जागांमध्ये मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आपल्या प्रवचनांतून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश सातत्याने देत असतात. केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही ते अधोरेखित करतात.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी गेल्या अनेक वर्षांपासून वसुंधरा पदयात्रा, वृक्षसंवर्धन जनजागृती अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून “झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्षतोड थांबवा” हा संदेश समाजापर्यंत सातत्याने पोहोचवत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून देशभरात पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ निर्माण झाली असून यंदाच्या अभियानात झालेली ६,१८,००९ वृक्षांची लागवड ही त्याच जनचळवळीची साक्ष देणारी ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.




