
मिरजोळेतील बंद घर फोडून ८.७३ लाखांचा मुद्देमाल लंपास; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि डॉलरची चोरी
रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अमेरिकन चलनातील ५४० डॉलरचा समावेश आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालिनी शंकर गंजे (वय ५०) या एमआयडीसी मिरजोळे येथील बहार बंगला क्रमांक ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. त्या ३१ ऑगस्ट रोजी रात्री घराला कुलूप लावून वैयक्तिक कामानिमित्त जळगाव येथे गेल्या होत्या.
दरम्यान, २ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे परत येत असताना दुपारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा रवींद्र पाटील यांनी फोन करून घराचे कुलूप तुटल्याची व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच गंजे यांना धक्का बसला.
सायंकाळी सुमारे सहा वाजता त्या घरी पोहोचल्या असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसून आले. घरातील सामानही विस्कटलेले होते. कपाटाची पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्याने सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, राणीहार, ब्रेसलेट, लक्ष्मीहार, कानातील डुल व टॉप्स, सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र यासह ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ५४० अमेरिकन डॉलर असा एकूण ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
या प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील हालचाली तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.



