आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन चार कोटींची खंडणी वसूल; महिला अटकेत!

मुंबई : व्हिडिओ कॉलचे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन घाटकोपरमधील ६१ वर्षीय व्यक्तीकडून सुमारे चार कोटी रुपये उकळल्याच्या आरोपावरून नाझिया मेहमूद शेख ऊर्फ नाझनीन या महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

घाटकोपर पश्चिम येथील एल. बी. एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ पाच लाख रुपये स्वीकारताना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता तिला पकडण्यात आले. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरात राहतात. ते कुर्ला पश्चिम येथील नातेवाइकांच्या सराफा पेढीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. २०२० मध्ये दागिने खरेदीसाठी दुकानात आलेल्या नाझिया हिच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवरून संपर्क सुरू झाला. आर्थिक अडचणी असल्याचे सांगून नाझियाने मार्च ते डिसेंबर २०२४ या काळात टप्प्याटप्प्याने सुमारे दहा लाख रुपये उसने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नाझियाने डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान तक्रारदारांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. या संभाषणादरम्यान ती विवस्त्र अवस्थेत दिसत होती. त्यानंतर या कॉलचे चित्रीकरण आपल्याकडे असल्याचा दावा करून ते प्रसारित करण्याची धमकी तिने दिल्याचा आरोप आहे. चित्रीकरण इंटरनेटवर प्रसारित होऊ नये यासाठी तिने पाच लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने तक्रारदारांनी पैसे दिले.

सुरुवातीला सराफा दुकानातील सोन्याचे दागिने वितळवून मिळवलेली सुमारे तीन लाख रुपये आणि दुकानाच्या गल्ल्यातून घेतलेली आणखी तीन लाख रुपयांची रोकड तक्रारदारांनी तिला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर चित्रीकरण नष्ट करण्यासाठी तसेच विविध यंत्रणांकडून कारवाई टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून वारंवार रक्कम मागण्यात आल्याचा आरोप आहे.

फेब्रुवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत रोख व ऑनलाइन माध्यमांतून सुमारे चार कोटी रुपये दिल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले. १० ऑगस्ट २०२६ रोजी कुर्ला पश्चिम परिसरातील न्यू मिल रोड येथे झालेल्या भेटीदरम्यान आणखी पैसे देणे शक्य नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यावेळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. पैशांची मागणी सुरूच राहिल्याने तक्रारदारांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

१८ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटमध्ये तक्रारदारांचा जबाब नोंदवण्यात येत असताना नाझियाने पुन्हा फोन करून पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडण्यासाठी सापळा रचला. पाच लाख रुपयांच्या बंडलात पाचशे रुपयांच्या २० खऱ्या नोटा आणि ९८० खेळण्यातील नोटा ठेवण्यात आल्या. तक्रारदार आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या नाझियाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच कथित खंडणीच्या रकमेचे व्यवहार कसे झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button