वाढत्या तापमानाचा फटका! प्राणी-पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास!

ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसत असून त्याचा परिणाम नागरिकांसोबतच, प्राणी-पक्ष्यांनाही बसू लागला आहे. भटके श्वान, मांजरी आणि पाळीव प्राण्यांना उष्माघाताचा त्रास होत असून मागील महिन्याभरापासून दररोज आठ ते १० तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी दिले. या संस्थेकडे आलेल्या तक्रारी आहेत. अन्यथा याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून ठाणे शहरातील तापमानामध्ये प्रंचड वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात अनेकदा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक होते. तापमानवाढीचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. ठाणे शहरात वृक्षतोड, काँक्रीटीकरणामुळे देखील तापमान कमी होण्यास मदत होत नाही असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ठाणेकर नागरिकांसोबतच पक्षी, भटके प्राणी आणि पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू लागला आहे.

ठाणे शहरात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सिटीझन फाॅर ॲनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन (कॅप) या स्वयंसेवी संस्थेकडे प्राणी-पक्षी उष्माघाताच्या दिवसाला किमान आठ ते १० तक्रारी प्राप्त होत आहे. यामध्ये सर्वाधिक श्वानांचा सामावेश आहे. त्यापाठोपाठ मांजरी आणि पक्षी यांचा सामावेश आहे. सरासरी प्रत्येकी १० प्राणी-पक्ष्यांपैकी किमान सहा श्वान उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती संस्थेने दिली. यामध्ये प्राणी-पक्षी बेशुद्ध पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहरात दिवसाला किमान आठ ते १० प्राणी-पक्षी उष्माघाताच्या तक्रारी प्राप्त झाल्या. आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या प्राणी-पक्ष्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करतो. प्राणी-पक्षी गंभीर स्थितीत असल्यास त्यांना डाॅक्टरांकडे तपासणीसाठी नेले जाते. नागरिकांनी त्यांच्या गृहसंकुलात पक्षी तसेच भटक्या प्राण्यांसाठी पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. तसेच येत्या काही दिवसांत अशा एक हजार पाण्याच्या भांड्यांचे आम्ही वाटप देखील करणार आहोत. श्वानांच्या शरिरावरील पूर्ण केस काढले जात असल्याने देखील श्वानांना उष्माघाताचा फटका सहन करावा लागत आहे. – सुशांक तोमर, कॅप संस्था.

वन्य जीवांना अद्याप धोका नाही

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांना वन्य जीवांबाबत विचारले असता, उद्यानात पाण्याचे काही नैसर्गिक स्त्रौत आहेत. त्यामुळे वन्यजीवांना उष्माघाताचा त्रास झाल्याची तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button