कोंडेतडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गाईच्या बछड्याचा फडशा, कुत्र्यालाही उचलून नेले


राजापूर नगरपरिषद हद्दीतील कोंडेतड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने गाईच्या बछड्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली असून, त्यानंतर रात्रीच्या सुमारास एका कुत्र्यालाही उचलून नेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.

कोंडेतड परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नुकताच बिबट्याने एका गाईच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, वारंवार विनंती करूनही वनविभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आजीम जैतापकर यांच्या घराजवळ बिबट्या एका कुत्र्याला घेऊन जात असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे.

मानवी वस्तीजवळच बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने कोंडेतड परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button