
रत्नागिरी शहरातील इसमाची कपड्याच्या शोरूमची फ्रेंचशी मिळवून देतो व खोट्या सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक
बनावट नियुक्तीपत्रे तयार करून पैसे उकळल्याचा आरोप; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तसेच विविध व्यवसायांसाठी फ्रँचायझी देण्याचे सांगून तब्बल सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश प्रकाश रसाळ (रा. परटवणे, सरोदेवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादी रॉबिन सोम्स राहणार मयुरेश अपार्टमेंट जयस्तंभ यांना झोडियो कपड्यांची फ्रँचायझी घेण्यासंदर्भात सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. मात्र, त्यानंतर फ्रँचायझी न देता पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
याशिवाय आरोपीने फिर्यादीच्या नातेवाईक भोळे यांना मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर नियुक्तीचे खोटे पत्र दिले तसेच दुसरे नातेवाईक पेटकर यांना मंत्रालयात क्लर्क च्या इंटरव्यू साठी खोटे पत्र व सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मंत्रालयातील उपजिल्हाधिकारी पदाची खोटी नियुक्तीपत्रे तसेच बांधकाम विभागातील नोकरीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दिल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली असता आरोपीने साडेबारा लाख रुपये रक्कम परत केली. मात्र, मोठी रक्कम अद्याप परत केलेली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच फिर्यादीच्या नातेवाईकांकडून सरकारी नोकरीच्या नावाखाली पैसे घेऊन बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारात आरोपीने फिर्यादीची एकूण सुमारे १ कोटी ३० लाख २ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता दाखल करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ४७६/२०२६ असा आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.




