
गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांविरोधात राजापूर पोलिसांची धडक मोहीम!
वर्षभरात ३४ जणांवर गुन्हे दाखल; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १६ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव
राजापूर : राजापूर तालुक्यात विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात राजापूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी धडक कारवाया करत तब्बल ३४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय, अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असलेल्या १६ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. सहज उपलब्ध होणारी आणि तुलनेने कमी किमतीत मिळणारी ही दारू अनेकांना व्यसनाच्या आहारी नेत आहे. या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, काहींना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, स्वस्त दरात सहज उपलब्ध होणाऱ्या या दारूच्या विळख्यात तरुण पिढीही अडकत असल्याने सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वर्षभरात ३४ जणांवर गुन्हे दाखल
या गंभीर प्रकाराची दखल घेत राजापूर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील विविध भागांत छापे टाकून कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या वर्षभरात तब्बल ३४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१६ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, या व्यवसायात वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार १६ जणांविरोधात संबंधित कायद्यातील कलम ९६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.
संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई होण्याची तरतूद आहे. या कारवाईच्या अनुषंगाने एका आरोपीला शासनाकडे पाच लाख रुपयांची दंडात्मक रक्कम जमा करावी लागल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवून गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रीच्या व्यवसायाला आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
गोवा बनावटीच्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकण्याबरोबरच अनेक कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्यही बिघडत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राजापूर पोलिसांकडून सुरू असलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. वर्षभरात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध दारू विक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




