
एसटी प्रवासात विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप….. कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते संजय कदम आक्रमक
खेड बसस्थानकात नागरिकांचा संताप; एसटी प्रशासनाला धरले धारेवर
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. खेड-भरणे मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवास करताना संबंधित वाहकाने गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थिनीने शाळेत पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक व प्रवासी खेड बसस्थानकात एकत्र आले. यावेळी नागरिकांनी एसटी प्रशासनाला जाब विचारत संबंधित वाहकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी खेडचे माजी आमदार संजय कदम यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. तसेच घटनास्थळी उशिरा पोहोचलेल्या पोलिसांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
संबंधित वाहकावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत कारवाईस विलंब झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कदम यांनी दिला. या प्रकरणामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधितांवर काय कारवाई होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.




