
‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ : रत्नागिरी जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी ११ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन जिल्ह्यातील उद्योजक व आस्थापनांना रिक्त पदे नोंदविण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २२ ): देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात एकाच दिवशी ५०० हून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात तालुका व जिल्हास्तरावर एकूण ११ ठिकाणी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी दिली आहे.
या महाकुंभाच्या माध्यमातून उद्योग, कंपन्या व विविध आस्थापनांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पात्र आणि कौशल्यधारक मनुष्यबळ मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपन्या, आस्थापना व नियोक्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्याकडील रिक्त पदांची नोंदणी करावी, जेणेकरून स्थानिक सुशिक्षित व कुशल तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रिक्त पदांच्या नोंदणीसाठी आवाहन
जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना व उद्योजकांनी आपल्याकडील रिक्त पदे https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर भरून अधिसूचित करावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी कार्यालयाशी (०२३५२) २९९३८५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील मेळाव्यांची ठिकाणे (मंगळवार, २९ सप्टेंबर):
- शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित बहुउद्देशीय हॉल, तळ्याचे वाकण, खेड शहर, ता. खेड
- गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, ॲड. एन. व्ही. जोशी मार्ग, जिल्हा न्यायालयाजवळ, रत्नागिरी
- मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, ता. रत्नागिरी
- डीकॅड (DeCAD) देवरूख कॉलेज ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन, भागवत संकुल, देवरूख, ता. संगमेश्वर
- कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ताज सिटी सेंटर, लांजा, जि. रत्नागिरी
- राजापूर हायस्कूल, राजापूर, ता. राजापूर
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अंजनवेल (RGTTL कंपनीजवळ), गुहागर
- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती), ता. चिपळूण
- ज्ञानदीप महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य), मोरवंड-बोरज, ता. खेड
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता. दापोली
- लोकनेते गोपीनाथजी मुंडे आर्ट्स, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, मंडणगड, जि. रत्नागिरी




