२९ सप्टेंबरला चिपळूणमध्ये ‘शौर्य दिन’ ; वीर माता-पिता व माजी सैनिकांचा गौरव


रत्नागिरी, दि. २२ ) – भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा ‘शौर्य दिन’ आणि राज्यात सुरू असलेले ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या संयुक्त औचित्याने वीर माता-पिता, वीर नारी व माजी सैनिकांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी चिपळूण येथील मार्कंडी, शिवाजीनगर बस स्टँड परिसरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या ‘गुरुदक्षिणा सभागृहात’ होणार आहे.
भारतीय सैन्य दलाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याची ही ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान राखण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि ‘सेवा परमो धर्म:’ या तत्त्वानुसार, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून हा गौरव कार्यक्रम होत आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि दिवंगत सैनिकांच्या विधवा पत्नींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button