बारा वर्षांत देशाचे अपरिमित नुकसान, आत्मचरित्र प्रकाशना आधीच सोनिया गांधी यांचे फटाके!

नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळात आपल्या देशाची, आपल्या लोकशाहीची आणि घटनात्मक संस्थांची अपरिमित हानी झाली आहे. उद्या हे सरकार गेले तरी देशाला पुन्हा योग्य ट्रकवर आणण्यासाठी बराच वेळ लागेल आणि त्यासाठी राजकीय पक्षांना खूप प्रयत्न करावे लागतील,’ असे परखड मत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मांडले.

सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र 10 नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर तमाशा होईल असे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी केले होते. त्यामुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच ‘द हिंदू’ला मुलाखत दिली. आत्मचरित्राच्या अनुषंगाने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या सोबतचे नाते, आणीबाणी, 2004 साली नाकारलेले पंतप्रधानपद, काँग्रेसची सद्यस्थिती आणि भाजपच्या राजकारणावर भाष्य केले.

‘मागच्या दोन दशकांत संसदीय राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून सभ्यता व शिष्टाचार नाहीसा झाला आहे. हुकूमशाही राजवटीमध्ये असलेली निष्ठgरता सध्या दिसत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘देशाचे जे काही नुकसान झाले आहे ते लोकांना कळू लागले आहे. त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. मात्र, देशातील जनता काँग्रेसचे पुन्हा नक्कीच स्वागत करेल,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोदींप्रमाणेच काँग्रेसमध्येही अनेक लोक तळागाळातून येऊन मोठे झाले आहेत. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे याबाबतीत आरएसएसकडून फार काही शिकण्यासारखे आहे, असे मला वाटत नाही.

आणीबाणी घोषित करण्यावरून आमच्या कुटुंबातच मतभेद होते. पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी असे राजीव यांचे मत होते. मात्र, संजय गांधी यांनी आग्रह धरला. विरोधकांना रोखायलाच हवे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे कुटुंबातही टेन्शन होते. संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवले असते तर पुढची हानी झाली नसती.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्षांना समान संधी मिळालेली नाही. निवडणूक आयोगासह सर्व संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. मीडिया, अमाप पैसा आणि धर्माचा वापर करून त्यांनी सर्वत्र पकड घट्ट केली आहे. मतचोरी करून निवडणुका कशा चोरल्या जात आहेत हेही अलीकडे स्पष्ट झाले आहे. असे असूनही काँग्रेस संघर्ष करत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे. भाजप-आरएसएसच्या आक्रमणाचा सामना करण्याची क्षमता असलेला हा एकमेव पक्ष आहे.

मी पंतप्रधान होण्यास राहुल, प्रियांकाचा विरोध होता!

2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए आघाडीचा विजय झाल्यानंतर माझ्यावर पंतप्रधान पदासाठी दबाव होता. पण राहुल व प्रियांका यांचा त्यास तीव्र विरोध होता. आजी व वडिलांच्या हत्येचा अनुभव त्यांना होता. त्यामुळे ‘अजिबात नाही’ असे त्यांचे म्हणणे होते. सततच्या दबावामुळे एका क्षणी ‘ठीक आहे’ असे म्हणत मी होकार दिला होता. मात्र नंतर निर्णय बदलला, असे सोनिया गांधी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button