ओम साई मित्र गणेशोत्सव मंडाळात ‘लोकसंवाद’ निवडणूक आयोगाचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६: १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दिष्ट — उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड


रत्नागिरी, दि. २२ )- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision) २०२६ कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, याद्वारे १०० टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रशासन काम करत आहे. असे मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ओम साई मित्र गणेशोत्सव मंडळात आयोजित ‘लोकसंवाद – २०२६’ उपक्रमात ते बोलत होते. मंडळाचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. या प्रसंगी अध्यक्ष अनंत आगाशे, उपाध्यक्ष संजीव शेंडगे, खजिनदार पराग सावंत, सचिव प्रविण नांदगावकर, अरुण कीर, गौरांग आगाशे, पत्रकार तन्मय दाते उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सुरुवातीला लोकसंवाद – २०२६ विषयी सविस्तर माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री गायकवाड म्हणाले, ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील मतदार यादीची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीमध्ये सन २००२ च्या यादीत नाव असणारे आणि सध्याच्या यादीत नाव असणारे (Mapped), तसेच २००२ च्या यादीत नसले तरी सध्याच्या यादीत नाव असणारे (Unmapped) मतदार समाविष्ट आहेत.
प्रारूप यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मयत, स्थलांतरित, व दुबार मतदारांची ‘ASD’ (Absent, Shifted, Dead/Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली असून, ती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटना (BLA) बीएलओमार्फत देण्यात आली आहे. अनमॅप मतदार आणि नावांमध्ये विसंगती (Anomalies) असणाऱ्या मतदारांची सुनावणी सुरू झाली असून ३० सप्टेंबर दावे-हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
युवा व महिला मतदारांच्या नोंदणीवर भर
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील सुमारे ४३,१९९ तरुण-तरुणींची नोंदणी अद्याप होणे बाकी असून, अशा पात्र नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत.
जिल्ह्याचे लोकसंख्या लिंग गुणोत्तर ११२२ असताना मतदार यादीतील लिंग गुणोत्तर १०३६ इतके आहे; हा मोठा गॅप भरून काढण्यासाठी महिला मतदारांची अधिकाधिक नोंदणी होणे आवश्यक असल्याचे आहे.
नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी उपलब्ध पर्याय
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी नागरिक खालील पद्धतींचा वापर करू शकतात:
नवीन नोंदणीसाठी ‘फॉर्म ६’, मयत मतदारांचे नाव वगळण्यासाठी ‘फॉर्म ७’, आणि स्थलांतरित, नाव, पत्ता किंवा फोटो बदलण्याच्या दुरुस्तीसाठी ‘फॉर्म ८’ भरून तहसील कार्यालय किंवा संबंधित बीएलओकडे सादर करावा. यासाठी रहिवासी व जन्म दाखल्याचा पुरावा आवश्यक आहे.
‘इसीआय नेट’ मोबाईल ॲप्लिकेशन किंवा voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून नागरिक घरबसल्या फॉर्म ६, ७ आणि ८ ऑनलाइन भरू शकतात. सुरक्षिततेसाठी यात आधार व्हेरिफिकेशन्सह डिजिटल सहीची प्रक्रिया समाविष्ट आहे.
लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि ज्यांचे नाव समाविष्ट नाही त्यांनी त्वरित अर्ज करून लोकशाहीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button