रियाज तबला अकॅडमीतर्फे नादब्रह्म आरती व भजन मंडळाच्या टी-शर्टचे अनावरण

रत्नागिरी : येथील रियाज तबला अकॅडमीतर्फे नादब्रह्म आरती व भजन मंडळाच्या टी-शर्टचे अनावरण ल. वि. केळकर सभागृह येथे नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्यात करण्यात आले.
यावेळी रियाज तबला अकॅडमीचे केदार लिंगायत, सोनक टोयोटा रत्नागिरी शाखेचे व्यवस्थापक अमित पाटील, ऑर्गनवादक महेश दामले, नादब्रह्म मंडळाचे संघप्रमुख कैलास दामले आणि तबलावादक पुष्कर सरपोतदार उपस्थित होते.
अकॅडमीमध्ये तबला शिकणारे आणि सोनक टोयोटा रत्नागिरी शाखेचे व्यवस्थापक अमित पाटील यांनी ही टी-शर्ट नादब्रह्म आरती व भजन मंडळातील सर्व सदस्यांना भेट दिली. रियाज तबला अकॅडमीच्या नव्याने सुरू झालेल्या नादब्रह्म आरती व भजन मंडळाने अवघ्या सहा महिन्यात सलग तीन आरती स्पर्धांमध्ये विजय मिळवत एक मोठे यश संपादन करीत रियाज तबला अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. याचे औचित्य साधून अमित पाटील यांनी संघातील सर्व मुलाना कौतुकाचा थाप आणि प्रोत्साहन देण्यासाठी टी-शर्ट भेट दिले. या टी-शर्ट वर रियाज तबला अकॅडमीचा लोगो आणि नादब्रह्म आरती व भजन मंडळाचा लोगो आहे.
याप्रसंगी ऑर्गनवादक महेश दामले यांनी मनोगतात आरती स्पर्धेतील यशाचा आढावा घेतला. फक्त तबला शिकणाऱ्या मुलानी स्थापन केलेले हे पहिलेच आरती व भजन मंडळ असल्याचे त्यांनी सांगितले. आरती आणि भजनाची परंपरा जपणे, त्यातून आनंद मिळवणे हा या मंडळाचा उद्देश आहे. यातूनच पारंपरिकतेला शास्त्राची जोड देवून आरती सादरीकरणामध्ये नवनवीन प्रयोग करत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेवून या मंडळाने घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच आता संघाची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. भविष्यात आणखी चांगली तयारी करून विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचे देखील महेश दामले यांनी सांगितले. कार्यक्रमाला संघातील सर्व सभासद, अकॅडमीमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button