
गुहागर आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ सन्मान! मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांचेकडून कौतुक
पर्यटनाच्या जागतिक नकाशावर रत्नागिरीची नवी ओळख; गुहागर आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ सन्मान!
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीनं २०२६-२७ या हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या दोन समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ सन्मान जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच या आंतरराष्ट्रीय सन्मानाच्या यादीत स्थान मिळालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा क्षण माझ्यासाठी विशेष अभिमानाचा आहे. आपल्या कोकणच्या निसर्गसंपन्न किनाऱ्यांना मिळालेली ही जागतिक ओळख म्हणजे पर्यटन विकासाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचं संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा कठोर आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्यामुळे हा बहुमान मिळाला आहे.
राज्य शासनाचे विविध विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून हे यश साध्य झालंय. या कामगिरीच्या निमित्तानं जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केलेल्या सन्मानानं मन भारावून गेलं. हा सन्मान मी रत्नागिरीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकाचा सन्मान मानतो.
या उल्लेखनीय यशासाठी जिल्हा प्रशासन, संबंधित सर्व विभाग, स्थानिक नागरिक आणि या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेली ही जागतिक ओळख कायम राखत, स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनसमृद्ध रत्नागिरी घडविण्यासाठी यापुढंही एकत्रितपणे प्रयत्न करूया! असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे




