श्री महालक्ष्मी मिनी मॉलच्या आगीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे विमा कंपनीला निर्देश

रत्नागिरी, दि. १२ ) : शहरातील के. सी. जैन नगर, मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला ऐन भाऊबीजेच्या पहाटे भीषण आग लागून मॉलमधील विविध आस्थापनांचे नुकसान झाले. उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नुकसानग्रस्त व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी, नुकसानग्रस्त व्यावसायिकांना विम्याची मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी संबंधित विमा कंपन्यांनी आजच नुकसानीचे सर्वेक्षण करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले.
दुर्घटनेची माहिती मिळताच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळेपर्यंत आपण स्वतः व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात होतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अग्निशमन दलाने चार ते पाच तास अथक परिश्रम घेत १० ते १५ बंबांच्या साहाय्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
लगतच्या दुकानाचेही स्वतंत्र सर्वेक्षण होणार
सणासुदीच्या काळात वर्षानुवर्षांच्या कष्टातून उभा केलेला व्यवसाय आगीच्या भक्ष्यस्थानी पडणे ही अत्यंत वेदनादायी बाब असून, या संकटातून दुकानदारांना पुन्हा ताकदीने उभे करणे ही आपलीही जबाबदारी असल्याची भावना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केली. विमा कंपन्यांना तातडीने पंचनामे व सर्वेक्षण करण्याच्या सूचना देतानाच, या आगीची झळ बसलेल्या मॉललगतच्या आणखी एका दुकानाचेही स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
तीन-चार दिवसांत मॉल पुन्हा सेवेत; अग्निसुरक्षेच्या सूचना
या दुर्घटनेनंतर आवश्यक त्या उपाययोजना व दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करून येत्या तीन ते चार दिवसांत ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
“आगीने दुकानांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी व्यापाऱ्यांची जिद्द आणि पुन्हा उभे राहण्याचा आत्मविश्वास कमी होता कामा नये. या कठीण प्रसंगी शासन व मी स्वतः व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि पाठपुरावा केला जाईल,” असा विश्वास पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button