रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा: स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये किनारपट्टी शहरांच्या श्रेणीत देशात तृतीय क्रमांक; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

रत्नागिरी, दि, ११ ): केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये रत्नागिरी शहराने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. देशातील किनारपट्टीवरील शहरांच्या श्रेणीत (Coastal Cities Category) रत्नागिरी शहराने देशभरात तृतीय क्रमांक पटकावला असून, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथे आज झालेल्या एका भव्य आणि दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरीच्यावतीने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर तसेच पाणी पुरवठा सभापती निमेश नायर, स्वच्छता सभापती राकेश नागवेकर यांनी मंचावर उपस्थित राहून हा गौरव स्वीकारला.
रत्नागिरी नगरपरिषदेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन, समुद्रकिनारे व सार्वजनिक परिसराची दैनंदिन स्वच्छता, ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहीम राबवली होती. नगरपालिका प्रशासन, स्वच्छता कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि रत्नागिरीकर नागरिकांनी दाखवलेला सक्रिय सहभाग यामुळेच शहर आज राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झाले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल रत्नागिरी शहर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यातून नगरपरिषद प्रशासन, सर्व पदाधिकारी व स्वच्छता दूतांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरीच्या संकल्पाला या पुरस्कारामुळे नवे बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button