चंद्रकांतदादा हिम्मत असेल तर विधानसभेला समोरासमोर लढा; सतेज पाटील यांचे आव्हान!

कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. तर त्याला प्रतिउत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खरपूस समाचार घेतला.

चंद्रकांतदादा हिम्मत असेल तर विधानसभेला समोरासमोर लढा, असे खुले आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी आज मंत्री चंद्रकांत पाटील यांना येथे दिले . याच वेळी सतेज पाटील यांनी, चंद्रकांतदादा कोल्हापूरचे आहेत. ते जेवढे मोठे होतायत, तेवढे त्यांची वैचारिक पातळी खाली चालली आहे, अशा शब्दात टीकास्त्र डागले.

मी सुद्धा पाटीलच!

सरकारी पदाचा, सत्तेचा वापर करुन धमक्या देऊ नका. उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत, मी सुद्धा पाटील आहे. २०२९ मध्ये कोल्हापूरच्या १९ मतदारसंघात लढूया, कार्यकर्त्यांच्या बळावर लढूया. पण अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनते सतेज पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर पलटवार केला.

न्यायालयेच न्याय देतील

गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आ सतेज पाटील यांनी, जनतेचा जनादेश बाजूला ठेवून महायुती असं करत असेल, तर न्यायालयच आम्हाला न्याय देईल, अशी भूमिका व्यक्त केली.

डीवाय दादांचा अपमान

मी आणि चंद्रकांतदादा १० वर्षे एकमेकांविरोधात लढत आहोत. पण स्वर्गीय डी वाय. पाटील दादा यांचा अपमान त्यांनी केला आहे, त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं, असा सल्ला सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला. कालच्या मोर्चात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी लोकांचा आक्रोश पहायला मिळाला.

महायुतीचा अध्यक्ष होऊनही आजच्या महायुतीच्या सभेत महायुतीच्या नेत्यांचे चेहरे आम्ही बघितले. ते किती प्रसन्न होते हे सर्वांनी बघितलं आहे. नेत्यांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून आले आहे. त्यांनाही वाटत होतं हे कुठेतरी चुकत आहे. विजयाचा उन्माद आज कोणाचा दिसला हे सर्वांनी बघितले आहे, अशी टिपणी सतेज पाटील यांनी महायुतीचा अध्यक्ष झाल्यावर केली.

बंटी म्हणूनच राहूद्यात

बंटीचा ‘बंटी साहेब’ झाला नाही. पण मला सांगायचं आहे की लोकांच्या हृदयात मला बंटी पाटील म्हणूनच राहायचं आहे. साहेब म्हणून नाही, अशा शब्दात सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी सतेज अजून बंटी राहिला आहे या टीकेला उत्तर दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button