फटाक्यांमुळे कल्याण डोंबिवलीत ७० आगीच्या घटना!

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत एकूण ७० आगीच्या घटना घडल्या. यामधील ६८ आगी या केवळ फटाक्यांमुळे लागल्या.

फटाक्यांमधील राॅकेट हा फटाका कचऱ्याचे ढीग, इमारतींच्या गच्चीवरील कागद, कपड्यांवर पडून आगी लागल्या. दोन आगीच्या घटना इतर कारणांमुळे घडल्या असण्याची शक्यता आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

पालिका अग्निशमन विभागाला या आगीची माहिती मिळताचा जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संध्याकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत अनेक भागात लागलेल्या आगी तात्काळ विझविण्यात यश मिळवले. या आगींमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, असे अग्निशमन प्रमुख चौधरी यांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी सात वाजता लक्ष्मीपूजन सुरू झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले.

हे फटाके नागरिकांनी मैदान, मोकळ्या जागेत जाऊन फोडण्याऐवजी सार्वजनिक रस्त्यावर, नागरी वस्तीत, चाळी, झोपडपट्टी भागात वाजविले. त्यामुळे या फटाक्यांचे उडालेले जळते तुकडे आजुबाजुच्या कचऱ्यावर, कापडावर पडून सर्वाधिक आगी लागल्या. काही आगी या फटाक्यांमधील हवेत उडविण्यात येणाऱ्या राॅकेटमुळे लागल्या. राॅकेटमुळे लागलेल्या आगींचे प्रमाण सर्वाधिक होते. ही राॅकेट घराच्या गच्चीवर, इमारतींच्या गच्चीवरील कपडे, कचरा, कागदांवर जाऊन पडले. त्यामुळे इमातींच्या गच्चीवर आगी लागल्याचे दिसून आले, असे चौधरी यांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेत सर्वाधिक म्हणजे १९ आगीच्या घटना घडल्या. कल्याण पूर्व भागात ११, डोंबिवली एमआयडीसी भागात १५, डोंबिवली पश्चिम भागात ११ आगीच्या घटना घडल्या. कल्याण, डोंबिवली पालिकेच्या विविध विभागात असलेल्या अग्निशमन विभागाला या आगींच्या घटनांची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आगी विझवल्या. या आगीच्या घटनांमध्ये वित्त हानी झाली. जीवित हानी झाली नाही, अशी माहिती चौधरी यांनी दिली. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर रेल्वे मैदानाच्या बाजुला डोंबिवली वाहतूक पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एक भंगार आणि एक नियमित वापरातील मोटारींना अचानक आगी लागल्या.

डोंबिवली वाहतूक विभागातील वाहतूक सेवक दिनकर सोमासे, मयूर ठाकरे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने हालचाली करून आजुबाजुला असलेल्या पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि एक चांगल्या स्थितीमधील वाहन आगीपासून दूर करण्यात यश मिळवले. त्यांनी ही माहिती तातडीने पालिकेच्या गरीबाचापाडा अग्निशमन विभागाला दिली. तातडीने घटनास्थळी येऊन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. फटाक्याचा पेटता तुकडा कचऱ्याच्या ढिगावर पडून त्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button