मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोळे वटारले तर सतेज पाटलांचे साम्राज्य रात्रीत उद्ध्वस्त; चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरात इशारा!

Satej is still a Bunty : गोकुळ दूध संघातील सत्ता संघर्षाने पुन्हा एकदा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झाले असल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष होणार असे स्पष्ट झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ समोर झालेल्या एका सभेवेळी सतेज पाटील यांच्यावर टीकेचे जोरदार प्रहार केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर का डोळे वटारले तर सतेज पाटील यांचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लहान मुलाला खेळणं मिळालं नाही की जसा तो हातपाय आपटून त्रागा करतो. आईला बोचकारतो. तसाच आरडाओरडा गेले पंधरा दिवस गोकुळच्या अध्यक्षपदावरून सुरू आहे., अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली

सतेज अजून बंटीच

चंद्रकांत पाटील म्हणाले मी सतेज पाटील यांना ‘बंटी साहेब’ म्हणून सन्मान द्यायचा प्रयत्न केला. पण ते अजून ‘बंटीच’ राहिले, अशा तिखट चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाषणाच्या ओघात सतेज पाटील यांच्या मालमत्तेच्या मुद्द्याला हात घातला. ‘तुम्ही काचेच्या घरात राहता. दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. तुमची मालमत्ता जाहीर करा. ती कुठून आली ते सांगा,’ असं आव्हान त्यांनी दिले. तुमच्यात धमक असेल तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये कामं घेऊन जाऊ नका. राहुल गांधींकडून काम करुन घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

डी. वाय. पाटलांवरही टीका

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणात दिवंगत नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचा संदर्भ घेत टीका केली. डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरायचे, असा उल्लेख करून त्यांनी सतेज पाटील यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केला. गोकुळचा वापर दूध उत्पादकांपेक्षा स्वतःच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस तेल लावलेला पैलवान

मुख्यमंत्र्यांनी मला शिक्षण मंत्री म्हणून आदेश द्यावा सतेज पाटील संपून जाईल. फडणवीस तेल लावलेला पैलवान आहे. भल्या भल्यांना सापडला नाही. फडणवीसांच्या नादाला लागू नका, मुंगी होऊन साखर खायची असते, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी बंटी पाटील यांना उद्देशून दिला.

बंटी म्हणजेच इंडिया आघाडी

महाविकास आघाडी म्हणजे केवळ ‘बंटी पाटील’ अशी अवस्था आहे. तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेही सोबत दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसकडून घटना पायदळी

महायुतीवर लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही गोकुळवर प्रशासक येऊ नये आणि पुन्हा निवडणूक लागू नये म्हणून नियमानुसार अध्यादेश काढला. ज्याला न्यायालयानेही मान्यता दिली. पण आधी घटना पायदळी कुणी तुडवली? इंदिरा गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वतःची खासदारकी आणि पंतप्रधानपद वाचवण्यासाठी देशभरातील २० लाख लोकांना तुरुंगात डांबले. माझी दिवंगत पत्नी विद्या ठाकूर केवळ आठवीत असताना तिचे आई, वडील, बहीण, भाऊ असे चारही जण १९ महिने तुरुंगात होते. आठवीतली मुलगी बिनखांबी गणेश मंदिराजवळ ठाकूर कंपनीचे दुकान चालवत आंदोलकांच्या घरी डबे पोहोचवत होती. अशी दडपशाही करणाऱ्या काँग्रेसने आम्हाला घटना आणि लोकशाही शिकवू नये, असा घणाघात त्यांनी केला.

सोनिया गांधींना दम

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग देऊ शकतो, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button