गोवळकोटच्या श्री करंजेश्वरी मंदिरात गळटुपणी आणि लोटांगण कार्यक्रम उत्साहात

दिवाळी पाडव्याला नवसपूर्तीसाठी भाविकांची गर्दी; मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप

चिपळूण : गोवळकोट येथील प्रसिद्ध श्री देवी करंजेश्वरी मंदिरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक गळटुपणी आणि लोटांगण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत ख्याती असलेल्या करंजेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पारंपरिक धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या कार्यक्रमात नवस केलेल्या भाविकांनी विविध पारंपरिक धार्मिक विधी करून आपला नवस पूर्ण केला. काही भाविकांनी तोंडात पेटती वात धारण केली, तर काहींनी पोटावर देवाची तलवार धारण करण्याचा विधी केला. पाठीला गळटुपणी करून घेणे आणि लोटांगण घालणे अशा प्रथा यावेळी पार पाडण्यात आल्या. नवस केलेल्या महिलांनी हातात देवीचे कडे धारण करून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवीच्या गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम असलेल्या या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांसह दूरवरून आलेल्या भक्तांनीही सहभाग घेतला.

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक धार्मिक विधी आणि देवीच्या दर्शनाने दिवाळी पाडव्याचा दिवस भाविकांसाठी भक्तिमय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button