
सायबर फसवणुकीचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश; दोन आरोपी जेरबंद
११ लाख ३७ हजार रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा उलगडा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी
रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ११ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीशी आरोपींनी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर आयपीओ आणि ओटीसी ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
आरोपींच्या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये जमा केले. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील तपास यांचा आधार घेतला. या तपासातून सोलापूर येथील मनी ट्रेलशी संबंधित आरोपी दादासाहेब चौगुले आणि त्याच्याशी संबंधित ऑपरेटेड टेल्स तुषार चौधरी ,धानाशिव येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर आरोपींना रत्नागिरी येथे आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौम्य कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल आदर्श डिंगवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरील गुंतवणुकीच्या टिप्सवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्थेची सत्यता तपासावी आणि अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थांमार्फतच व्यवहार करावेत.
आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.




