
रत्नागिरीत पहाटे आगीचे भीषण तांडव! महालक्ष्मी मिनी मॉल आगीत भस्मसात
तीन मजली मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी; आसपासच्या दुकानांसह कार्यालयांनाही धोका; अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील के. सी. जैन नगर येथील महालक्ष्मी मिनी मॉलला बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठे अग्नितांडव घडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि मॉलचे तिन्ही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी शहर हादरले आहे.पहाटे लागलेली ही आग अनेक तास उलटूनही नियंत्रणात येत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. सुरुवातीला तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने अतिरिक्त अग्निशमन बंब मागवण्यात आले. सहा ते आठ अग्निशमन बंबांच्या माध्यमातून जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.दिवाळीच्या मालामुळे आगीने घेतला भीषण पेटदिवाळीचा सण असल्याने महालक्ष्मी मिनी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा माल भरून ठेवण्यात आला होता. दुकानातील साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तूंनी आगीला अधिकच वेग दिला. त्यामुळे आग इमारतीच्या आतील भागात सतत धुमसत राहिली. या भीषण आगीत मॉलमधील संपूर्ण माल आणि फर्निचर जळून खाक झाले असून इमारतीचा मोठ्या प्रमाणावर भाग उद्ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांचे लाखो ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.धुराचे लोट मारुती मंदिर ते माळनाका परिसरापर्यंतआगीमुळे निर्माण झालेले धुराचे प्रचंड लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. पहाटेच्या थंडीमुळे सुरुवातीला अनेकांना हा धूर असल्याचे लक्षात आले नाही. मात्र, काही वेळातच मारुती मंदिरापासून माळनाका परिसरापर्यंत धुराचे थर पसरल्याने नागरिकांना आगीच्या भीषणतेची जाणीव झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; आग आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हानघटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. इतर ठिकाणांहूनही अग्निशमन बंब मागवण्यात आले. जवानांकडून सातत्याने पाण्याचा मारा सुरू असूनही मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात साठवलेला माल आणि आतील ज्वलनशील साहित्य यामुळे आग पूर्णपणे विझवण्यात अडचणी येत आहेत. इमारतीच्या आतील परिस्थिती धोकादायक असल्याने बचावकार्य करताना जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे.ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे व्यापारी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. आगीचे नेमके कारण, नुकसानीचा अधिकृत आकडा आणि आसपासच्या इमारतींचे झालेले नुकसान याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रत्नागिरी शहरातील या भीषण अग्नितांडवामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.






