
अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातअंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे मार्गदर्शन
रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षा डॉ. स्वराली शिंदे यांनी समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या यांची माहिती दिली. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि विश्वासपूर्ण वातावरण मिळावे, या दृष्टीने समितीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी अधिवक्ता सौ. प्रिया लोवलेकर यांनी विविध प्रत्यक्ष अनुभव आणि वास्तवातील उदाहरणे मांडली. कामाच्या ठिकाणी महिलांना येणाऱ्या समस्या, त्यांचे स्वरूप, अशा प्रसंगांमध्ये घ्यावयाची काळजी आणि उपलब्ध कायदेशीर उपाययोजना यांविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले.
विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अॅड. आशिष बर्वे यांनी कायद्याची पार्श्वभूमी, विशाखा समितीची स्थापना होण्यामागील कारणे, तिची आवश्यकता आणि कायदेशीर तरतुदी यांची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी अशा समितीची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. बर्वे यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा आढावा घेतला. महाविद्यालयातील प्रत्येकाने आपली वर्तणूक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने ठेवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. स्त्री सबलीकरण, महिलांसाठी असणारे विविध कायदे आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अधिकार व कार्य यांविषयी सर्वांनी जागरूक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. शिल्पा तारगावकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. मानसी गानू यांनी आभार मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, मुख्य लिपिक नंदकिशोर गोळपकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




