
पेन्शनधारकांसाठी दिलासादायक उपक्रम; पोस्ट विभागामार्फत घरबसल्या मिळणार डिजिटल हयातीचा दाखला
३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम सुरू; 'फेस ऑथेंटिकेशन'मुळे ज्येष्ठांना मोठी सोय
रत्नागिरी, दि. १२ ): भारतीय डाक विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट्स् बँक (IPPB) आणि केंद्र सरकारच्या पेन्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पेन्शनधारकांसाठी ‘नेशनवाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (DLC) कॅम्पेन ५.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनधारकांना आता घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) काढता येणार आहे. ही विशेष मोहीम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये सुरू राहणार असल्याची माहिती विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश एस. कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकांमध्ये जावे लागत असे. वाढते वय, लांबच लांब रांगा आणि तासनतास प्रतीक्षा यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पोस्ट विभागाच्या या डिजिटल सुविधेमुळे पेन्शनधारकांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा त्रास वाचणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या विशेष सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- घरपोच सेवा आणि पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा: पेन्शनधारक आपल्या नजीकच्या पोस्टमनला घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांतच ऑनलाइन पद्धतीने आपला हयातीचा दाखला सादर करू शकतात.
- फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय: अनेकदा वृद्धापकाळामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) स्पष्ट उमटत नाहीत, परिणामी दाखला काढताना तांत्रिक अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी या प्रणालीत ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा ओळख पडताळणी) चा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे बायोमेट्रिकमध्ये अडचण येणाऱ्या पेन्शनधारकांची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विनाअडथळा पूर्ण होणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व केंद्र व राज्य शासकीय तसेच इतर पात्र पेन्शनधारकांनी बँकांमधील गर्दी टाळून या घरपोच सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ३० नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ज्ञानेश एस. कुलकर्णी यांनी केले आहे.




