
एका कार्यक्रमाची दोन बिले?; राजापूर पंचायत समिती सभेत सभापती-उपसभापतींमध्ये खडाजंगी
एकात्मिक बालविकास विभागाच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी; रस्ते, महावितरण आणि एसटी सेवेवरही सदस्यांचा संताप
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत एकात्मिक बालविकास विभागाशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यावरून सभापती नंदिनी कदम आणि उपसभापती अभिजित गुरव यांच्यात खडाजंगी उडाली. एका कार्यक्रमासाठी दोन बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करत उपसभापती अभिजित गुरव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सभापती नंदिनी कदम यांनी तत्काळ निर्णय घेण्याऐवजी स्वतंत्र बैठकीत सविस्तर चर्चा करण्याची भूमिका मांडल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी आणि खातेप्रमुख उपस्थित होते. सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी दोन बिले काढण्यात आल्याचा आरोप करत उपसभापती गुरव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये. गैरव्यवहार करणाऱ्यांना संरक्षण मिळता कामा नये. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना उघडे पाडले जाईल,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
त्यावर सभापती नंदिनी कदम यांनी, “या विषयाची माहिती सर्व सदस्यांना पूर्वीच देणे आवश्यक होते. त्यानंतरच सविस्तर चर्चा होऊ शकली असती. तत्काळ निर्णय घेणे योग्य ठरणार नाही,” असे मत व्यक्त केले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती यांच्या भूमिकेत स्पष्ट मतभेद दिसून आले.
यानंतर काही सदस्यांनी मध्यस्थी करत या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार हा विषय तूर्तास स्थगित करण्यात आला.
दरम्यान, सभेत सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच इतर विभागांच्या कामकाजावरही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डे आणि रस्त्यालगत वाढलेली झाडी यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.
ओणी–अनुस्कुरा मार्ग, केळवली रेल्वे स्थानक मार्ग तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत शिवसेना गटनेते उमेश पराडकर, सदस्या अपूर्वा मासये आणि भाग्यश्री लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पंचायत समितीच्या आवारातील वाढलेली झाडी तसेच कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सदस्य पंढरीनाथ मयेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. स्मार्ट मीटरबाबतही सदस्यांनी विविध शंका उपस्थित करत महावितरणकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.
तालुक्यातील एसटी सेवेबाबत अनेक तक्रारी प्रलंबित असतानाही राजापूर एसटी आगाराचा एकही वरिष्ठ अधिकारी सभेला उपस्थित नसल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागाच्या अनुपस्थितीचीही सभेत गंभीर दखल घेण्यात आली.
सभेच्या शेवटी तालुक्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.




