
संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय ठेवून अडचणी दूर करूया : डॉ. मकरंद साखळकर
संस्कृत शिक्षक मंडळातर्फे दोन दिवसीय कृतिसत्र सुरू


रत्नागिरी : उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाले असले तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इतर विषयांच्या तुलनेत संस्कृतची अभ्यासक्रमातील स्थिती आणि अंमलबजावणीचे काम अजून प्रगतीपथावर आहे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या वतीने गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित संस्कृत गुणगौरव समारंभ, कृतिसत्र उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संस्कृत भारतीचे संस्कृतभारती पश्चिमक्षेत्र प्रशिक्षण प्रमुख नीरज दांडेकर, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्मिता सरदेसाई, व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. साखळकर म्हणाले की, संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. असून, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कालिदासांचे साहित्य, गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, व्याकरण आणि तत्त्वज्ञान यांसारख्या सर्व ज्ञानशाखांचे मूळ आणि अमूल्य ठेवा संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. महाविद्यालयात संस्कृतचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयामध्ये बीए संस्कृत, एमए संस्कृत तसेच इतर २८ यूजी अभ्यासक्रम आणि १६ पीजी अभ्यासक्रम पद्धतीप्रमाणे शिकवले जात आहेत. महाविद्यालयाने संस्कृत हा विषय आर्ट्स फॅकल्टी व्यतिरिक्त सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीमध्ये देखील ‘अॅबिलिटी एन्हाँसमेंट कोर्स’ म्हणून क्रेडिट्सच्या स्वरूपात सुरू केला आहे, जेणेकरून इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकता येईल.
याप्रसंगी नीरज दांडेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. २०३० पर्यंत सर्व राज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे. यात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश केला आहे. त्यामुळे या बदलाकडे शिक्षकांनी सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारचा शालेय अभ्यासक्रम आराखडा मिळताजुळता आहे. बदललेल्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमाचा विचार करून शालेय अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील.
प्रास्ताविकामध्ये स्मिता सरदेसाई म्हणाल्या की, संस्कृत शिक्षक मंडळ १९७८ पासून कार्यरत आहे. काही दिवंगत व माजी शिक्षकांनी ही संघटना चांगल्या रितीने जोपासली असून तेच कार्य पुढे चालू आहे. उद्या या कृतिसत्राचा समारोप विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, आजी-माजी शिक्षकांचा सन्मान आदी कार्यक्रमांनी होणार आहे. संस्कृतच्या उपक्रमांना डॉ. कल्पना आठल्ये यांचे मार्गदर्शन, सहकार्य, लाभत असते. त्यांच्यामुळेच आज येथे कार्यक्रम आयोजित करता आला.
याप्रसंगी डॉ. साखळकर, डॉ. आठल्ये व श्री. दांडेकर यांचा सन्मान स्मिता सरदेसाई यांनी केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व संस्कृत शिक्षक आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे संस्कृतचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.




