चांदोर उगवतीवाडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य जाहीर पक्षप्रवेश

विविध पदाधिकाऱ्यांच्या नविनियुक्त्या व विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील चांदोर उगवतीवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा रविवारी (८ नोव्हेंबर) अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात संपन्न झाला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना वाढीसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली, तसेच स्थानिक विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ध्येयधोरणांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून चांदोर उगवतीवाडी येथील गावकर दिलीप गुळेकर, सुरेश चांदोरकर, अशोक गुळेकर, माजी उपसरपंच शांताराम तांबे, विनोद शिंदे, हरिश्चंद्र गुळेकर, शामकांत गुळेकर, सुरेश गुळेकर, संजय गुळेकर, नरेंद्र गुळेकर, यशवंत गुळेकर, शशिकांत तांबे, संतोष तांबे, सतिश तांबे, शंकर तांबे, प्रकाश फुटक, विलास फुटक, मनोहर तांबे, शरद शिंदे, किरण शिंदे, सुहास गुळेकर, किरण गुळेकर, योगेश गुळेकर, संजय करसोडे, अक्षय गुळेकर, नारायण गुळेकर, राज तांबे, आयुष तांबे, तनिष चांदोरकर, सुजल फुटक, शामकांत चांदोरकर व महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संघटना वाढीसाठी नवनियुक्त्या करून पक्षातील जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर देण्यात आली. रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री. कदम यांच्या हस्ते युवासेना गोळप पंचायत समिती गणाच्या उपविभाग अधिकारीपदी योगेश पड्यार, वॉर्ड क्र. २ युवासेना शाखा अधिकारी पदी सुहास गुळेकर, उपशाखाप्रमुख पदी सतीश तांबे, गटप्रमुख पदी शशिकांत तांबे व दिनेश कुळ्ये, बुथप्रमुखपदी विनोद शिंदे व संकेत पड्यार आणि बीएलए पदी राजेंद्र बनकर यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
या सोहळ्यात गावातील विकासकामांना गती देत, युवासेना गोळप पंचायत समिती गणाचे उपविभाग अधिकारी योगेश पड्यार व चांदोर गावचे उपसरपंच तथा माजी खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत तांबे यांच्या माध्यमातून दुर्गामाता मंदिरासमोर लादी बसविणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाडीचे गावकर दिलीप गुळेकर व योगेश पड्यार यांच्या हस्ते भूमिपूजन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान उपस्थित नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि ग्रामस्थांना संबोधित करत पक्षात त्यांचे कौतुक केले आणि मोलाचे मार्गदर्शन केले. सोहळ्यात मुख्य मार्गदर्शन करताना रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. ते म्हणाले की, सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता, देशातील व राज्यातील शेतकरी आणि तरुण वर्ग अनेक संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे हेच सध्याच्या शेतकरी व युवा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठाकरे ठासून लढा देत आहेत. हा लढा केवळ राजकीय नसून सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांचा आहे आणि चांदोर उगवतीवाडीतील ग्रामस्थांनी या लढ्यात सामील होऊन योग्य पाऊल उचलले आहे.
याप्रसंगी बोलताना माजी युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद सावंत यांनी चांदोर उगवतीवाडीतील या जाहीर प्रवेशाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, आजचा हा पक्षप्रवेश म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पहिलाच एवढा मोठा प्रवेश आहे. वाडीतील काही ग्रामस्थांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हा सोहळा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. या प्रवेशामुळे पक्षाला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.
तालुका समन्वयक शेखर घोसाळे यांनी नवनवीन कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेची आणि खंबीर पाठिंब्याची ग्वाही दिली. त्यांनी स्पष्ट केले की, तुम्ही सर्वांनी निष्ठावंतांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता तुमची सर्व जबाबदारी आमची आहे. यापुढे तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी शिवसेना नेते विनायक राऊत आणि उदय बने यांच्या खंबीर आधिपत्याखाली व दूरदृष्टीमुळे चांदोर गावातील अनेक महत्त्वाचे विकासप्रकल्प, पायाभूत सुविधा आणि लोकहितार्थ कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. गावात झालेली प्रगती ही त्यांच्याच नेतृत्वाचा परिपाक आहे. गावाचा हा विकास रथ असाच अविरत सुरू राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली की, यापुढेही चांदोर गावातील उर्वरित सर्व विकासकामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने आणि प्राधान्यक्रमाने पूर्ण केली जातील.
तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनीही चांदोर उगवतीवाडीतील ग्रामस्थांचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलाने पक्षात स्वागत केले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देताना, गावाच्या प्रगतीसाठी आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भव्य सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख (जिल्हासमन्वयक) रवींद्र डोळस, तालुका समन्वयक शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, माजी युवासेना जिल्हा अधिकारी (जिल्हा युवाधिकारी) प्रसाद सावंत, लांजा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, पावस विभागप्रमुख रविकिरण तोडणकर, आणि भाट्ये उपविभागप्रमुख राकेश भाटकर उपस्थित होते. तसेच चांदोर शाखाप्रमुख सुनील पड्यार, राजेंद्र कोलगे, सनी गोताड, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद पड्यार, उपशाखाप्रमुख दीपक कांबळे, युवासेना शाखा अधिकारी योगेश पड्यार, उपसरपंच सूर्यकांत तांबे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बनकर, साक्षी चांदोरकर, कट्टर शिवसैनिक रामचंद्र उर्फ दणक्या कोकरे, संतोष मेस्त्री व इतर सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर पक्षप्रवेशामुळे आणि नेत्यांच्या खंबीर विधानांमुळे चांदोर व गोळप परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद कमालीची वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button