
कोकण-सातारा जोडणारा केबल स्टे ब्रिज उद्घाटनासाठी सज्ज!

खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी केबल स्टे ब्रिज आता उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील शिवसागर जलाशयावर उभारण्यात आलेल्या या भव्य पुलाचे काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पूल केवळ दळणवळणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईतील वरळी सी लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाचा केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची संकल्पना पुढे आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली. त्यामुळे हा पूल त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.
या पुलाची लांबी तब्बल ५४० मीटर, तर रुंदी १४ मीटर आहे. पुलाच्या मध्यवर्ती भागात सुमारे ४३ मीटर उंचीची आकर्षक व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना कॅप्सूल लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार असून, जिन्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. येथून कोयना जलाशयाचे विस्तीर्ण बॅकवॉटर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य अनुभवता येणार आहे. या वैशिष्ट्यांमुळे हा पूल भविष्यात पर्यटनाचे नवे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
टी अँड टी कंपनीमार्फत या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून, अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत हा अभियांत्रिकी आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी पुलावर वाहन चालवून वाहतुकीच्या दृष्टीनेही पाहणी केली होती. गणेशोत्सवाच्या काळात काही कालावधीसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या मार्गाचा प्रवाशांना चांगला उपयोग झाला.
या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरकडे जाण्याचे अंतर सुमारे ५० किलोमीटरने कमी होणार आहे. तापोळा ते गाढवली-आहिर या भागाला जोडणाऱ्या या पुलामुळे कोयना खोऱ्यातील दुर्गम गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात शिवसागर जलाशयातून बार्जच्या साहाय्याने करावा लागणारा जीवघेणा प्रवास टाळता येणार असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाबळेश्वरचे तत्कालीन उपअभियंता अजय देशपांडे यांच्या कामाची शासनाने विशेष दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्यातील एकूण १८ अभियंत्यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव करण्यात आला. यामध्ये उपअभियंता संवर्गातील राज्यातील पाच अभियंत्यांची निवड करण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते अजय देशपांडे यांच्यासह प्रल्हाद अनंत पाठक, विजय सिद्धिविनायक बापट, सचिन निवृत्ती तायडे आणि राजेंद्र त्रिंबक विराजदार यांचा गौरव करण्यात आला.
महाबळेश्वर येथे उपअभियंता म्हणून कार्यरत असताना अजय देशपांडे यांनी तापोळा-सह्याद्री-खांदाटी खोऱ्यातील भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या प्रकल्पात तांत्रिक अचूकता, बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या निकषांना प्राधान्य दिले. या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी पूल पूर्णत्वास गेल्याने पर्यटन आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून या पुलाकडे जाणारा रघुवीर घाट मार्ग मात्र अद्याप धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे पुलाचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी रघुवीर घाटाची तातडीने दुरुस्ती, रस्त्याचे मजबुतीकरण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिक सुविधांनी सज्ज असा पूल उभारण्यात आला आहे, तर दुसरीकडे त्याला जोडणाऱ्या घाटमार्गाची दुरवस्था कायम असल्यास या प्रकल्पाच्या अपेक्षित लाभावर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे शासनाने रघुवीर घाटाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
एकूणच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करणारा, अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरणारा आणि पर्यटनाला नवी दिशा देणारा हा केबल स्टे ब्रिज उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र या पुलाला जोडणाऱ्या रघुवीर घाटाचा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लागणे आवश्यक आहे.




