लाच प्रकरणी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार निलंबित,४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप


कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाच प्रकरणात आरोग्य विभागाने निलंबित केले आहे. गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट देण्याच्या बदल्यात एका महिलेकडून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी कारवाई केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. मदार या वर्ग-२, अ गटातील वैद्यकीय अधिकारी आहेत. एसीबीच्या कारवाईनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला होता. या प्रस्तावावर विचार करून अखेर त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजी सायंकाळी कामथे उपजिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचून कारवाई केली होती. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट देण्यासाठी डॉ. मदार यांनी ४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

एसीबीच्या कारवाईदरम्यान तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम खासगी चारचाकी वाहनात स्वीकारल्याचा आरोप डॉ. मदार यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय चौकशीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने डॉ. मदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button