‘आम्ही ऑपरेशन सांगून करत नाही, थेट करतो’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे, काँग्रेसवर हल्लाबोल

दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य; ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’, अशी ग्वाही

मुंबई : “पत्रकार विचारतात, ऑपरेशन १.० आणि २.० झाले, आता ऑपरेशन ३.० कधी? आम्ही ऑपरेशन सांगून करत नाही, थेट करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. परभणीपासून लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन आणि २५ हजार सायकलींचे वाटप सुरू करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांच्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची जबाबदारीही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, शिक्षण, कर्जवसुली, वीजबिल, चारा आणि पाणी अशा विविध बाबींमध्ये १२ प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यासह दुष्काळी मदतही मिळणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटी रुपये दिल्याचा दावा करत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आश्वस्त केल्याचे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला जनतेने मतदान केले होते; मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. हीच खरी मतचोरी, नव्हे तर मतदारांनी दिलेल्या कौलावर टाकलेला दरोडा होता, अशी टीका शिंदे यांनी केली.

काँग्रेसने देशाला लुटले आणि बूथ कॅप्चरिंगच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या, असा आरोपही त्यांनी केला. मतदार याद्यांबाबत विरोधकांकडून सोयीचे राजकारण केले जात असल्याचे सांगत त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. विरोधक न्यायव्यवस्थेवर हल्ला करत असून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘हा नवा भारत आहे’

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील परिस्थितीचा संदर्भ देत विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले, “हा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, तर हिंदुस्थान आहे. हा नवा भारत आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा भारत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असली, तरी मोदी यांना ३६ देशांनी नागरी पुरस्कार देऊन गौरविले आहे, असेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून ३२ कोटी लोकांना अन्नधान्य देण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘शिवसेनेची ताकद वाढतेय’

शिवसेनेचे सध्या १५ खासदार, ७४ आमदार आणि एक हजारांहून अधिक नगरसेवक असल्याचे सांगत शिंदे यांनी ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद असल्याचे म्हटले. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून पक्षात येणाऱ्यांची रांग लागल्याचा दावाही त्यांनी केला.

“मी डॉक्टर नाही; पण मोठमोठी ऑपरेशन्स करतो,” असे म्हणत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींबाबत सूचक विधान केले. हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना पुढे जात राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दसरा मेळाव्यातील भाषणातून शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देतानाच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button