
सहा महिन्यांत ३.५ कोटींचे उत्पन्न; तरीही चार एक्स्प्रेसच्या थांब्यांची प्रतीक्षा!
संगमेश्वर रोड स्थानकासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा; रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडे लक्ष
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने अवघ्या सहा महिन्यांत सुमारे ३.५ कोटी रुपयांचे, तर गणेशोत्सव काळात तब्बल ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. असे असतानाही या स्थानकावर चार महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळालेला नाही. या गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींसह विविध स्तरांतून पाठपुरावा सुरू असून, आता रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडे संगमेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकाला मिळणारे उत्पन्न लक्षात घेता, येथे अधिक रेल्वेगाड्यांना थांबा मिळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. मात्र, चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्स्प्रेसना अद्याप थांबा मिळालेला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
बांद्रा–मडगाव एक्स्प्रेस (१०११५/१०११६), श्री गंगानगर–तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (१६३११/१६३१२), अजमेर–एर्नाकुलम मरुसागर एक्स्प्रेस (१२९७७/१२९७८) आणि जबलपूर–कोईम्बतूर एक्स्प्रेस (०२१९७/०२१९८) या चार गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, पद्मश्री दादा इदाते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केला.
सहा महिन्यांत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या स्थानकावर प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा आहे. रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या चारही एक्स्प्रेसच्या थांब्यांबाबत रेल्वे बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.




