
महिला सक्षमीकरण विशेष लेख/वृत्तगाव ते दिल्ली: प्रज्ञा पवार यांची शेती आणि उद्योगातील ‘उत्तुंग’ भरारी !
कोकणच्या लाल मातीत जिद्द पेरली की यशाचं सोनं उगवतं, याचा प्रत्यय लांजा तालुक्यातील मठ असोडे येथील प्रज्ञा प्रकाश पवार यांच्या रूपाने येत आहे. चुलीच्या धुरापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून त्यांनी घेतलेली ही झेप जिल्ह्यातील हजारो महिलांसाठी पंखात बळ देणारी ठरली आहे.
कृषी सखी ते दिशादर्शक: बदलाचं नवं तंत्र
२०१४ मध्ये ‘उमेद’शी जोडलं गेलेलं प्रज्ञा ताईंचं नातं आज एका वटवृक्षासारखं विस्तारलं आहे. २०१७ मध्ये त्यांनी ‘कृषी सखी’ म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि परिवर्तनाला सुरुवात झाली. कुर्णे आणि गवाणे या गावांत त्यांनी पारंपरिक भातशेतीला फाटा देत महिलांना ‘श्री’ पद्धतीचं आधुनिक तंत्र शिकवलं. सुरुवातीला संशय घेणाऱ्या नजरांनी जेव्हा भाताचं भरघोस उत्पन्न पाहिलं, तेव्हा संपूर्ण गावच या तंत्राच्या प्रेमात पडलं. भातासोबतच नाचणी लागवड आणि जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा मंत्र देत त्यांनी घराघरांत आर्थिक सुबत्ता आणली.
नर्सरीचा दरवळ: कलमांतून फुललं अर्थकारण
प्रज्ञा ताईंनी केवळ उपदेश केला नाही, तर स्वतःच्या कृतीतून आदर्श उभा केला. आपल्या पतीच्या खंबीर साथीनं त्यांनी स्वतःचा कौटुंबिक नर्सरी व्यवसाय ‘उत्तुंग’ शिखरावर नेला. त्यांच्या नर्सरीत आज वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ या काजू जातींची १० ते १५ हजार रोपे दिमाखात डोलत आहेत. आंबा, नारळ, सुपारी, कोकम आणि सोनचाफ्याच्या कलमांतून होणारी लाखोंची उलाढाल त्यांच्या परिश्रमाची साक्ष देते. विशेष म्हणजे, त्यांनी गावातील ५ ते ७ महिलांना हक्काचा रोजगार दिला असून, शेकडो भगिनींना ‘कलम बांधणी’चं मोफत प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवलं आहे.
हस्तकला आणि प्रदर्शनांची मजल केवळ शेतीच नव्हे, तर हातातील कलेलाही त्यांनी वाव दिला. शिवणकामाची आवड असलेल्या प्रज्ञा ताईंनी कापडी पिशव्या आणि बॅग्ज बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी बनवलेल्या वस्तूंनी ‘रत्नागिरी सरस’पासून ते मुंबईच्या ‘महालक्ष्मी सरस’पर्यंत आपली छाप पाडली आहे.
दिल्लीचा दरबार आणि राष्ट्रीय गौरव
प्रज्ञा ताईंच्या कार्याची खरी पावती तेव्हा मिळाली, जेव्हा त्यांची निवड थेट राजधानी दिल्लीसाठी झाली. माननीय पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या महिला कृषी प्रतिनिधींच्या कार्यक्रमात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. एका ग्रामीण भागातील महिलेनं दिल्लीच्या दरबारात जिल्ह्याचा मान वाढवावा, ही बाब संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सेंद्रिय शेतीचा वसा
सध्या त्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पा’त कार्यरत असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार करत आहेत. जिवामृत, बिजामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर करून त्यांनी ‘परसबाग’ ही संकल्पना घराघरांत रुजवली आहे.
”जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर आकाशाला गवसणी घालता येते,” हे प्रज्ञा ताईंनी सिद्ध करून दाखवलं आहे. गावातून सुरू झालेला हा प्रवास आता जागतिक क्षितिजाकडे झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांचा हा संघर्ष आणि यश नक्कीच प्रेरणादायी आहे.
– अमृता भातडे-धुंदूर
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी




