
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे नाणीज हायस्कूलच्या ७० विद्यार्थ्यांना मोफत Study Buddy App

५ ऑगस्ट २०२६ | नाणीज
शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहू नयेत, तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे नाणीज हायस्कूल येथे दहावीच्या ७० विद्यार्थ्यांना मोफत Study Buddy App चे वितरण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. दहावीच्या बोर्ड परीक्षेसोबतच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले हे ॲप विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी डिजिटल साधन उपलब्ध करून देणे देणार आहे.
खासगी शिकवणीचा खर्च परवडत नाही, तसेच शहरापासून दूर असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी गरजू विद्यार्थ्यांची निवड करून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रोटे. डॉ. संदीप करे यांनी पुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यातील अशा गरजू ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. टप्प्याटप्प्याने एकूण ५०० विद्यार्थ्यांना मोफत Study Buddy App उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट क्लबने निश्चित केले आहे.
कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०च्या रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअरमन रोटे. वर्षा बांदेकर, रोटे. बिपिन गांधी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे सचिव रोटे. सिताराम सावंत, खजिनदार रोटे. विनायक निकम तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाणीज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रुपाली सावंतदेसाई आणि शाळेच्या संचालक मंडळातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक करून नाणीज हायस्कूलची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मुळ्ये मॅडम यांनी केले.
रोटरीच्या Basic Education & Literacy या कार्यक्षेत्रांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून, पुढील टप्प्यात आणखी ४३० विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा मानस रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट रोटे. डॉ. संदीप करे यांनी सांगितले.




