जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रम ; प्रभात फेरी, आरोग्य शिबिर व सायबर जनजागृती

रत्नागिरी, दि. २ 0): सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि आधुनिक काळातील सायबर गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

*दिवसाची सुरुवात सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, कुवारबांव येथील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. या फेरीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

*सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन*
सामाजिक न्याय भवनात पोलीस विभागाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत पोलीस उपनिरीक्षक (सायबर क्राईम) तुषार जाधव व दशरथ कांबळे यांनी सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीपासून बचाव कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती दिली. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित ‘१९३०’ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सायबर सुरक्षेसाठी ‘M-Kavach 2’, ‘संचार साथी’ ॲप आणि बँकिंग सुरक्षेसाठी ‘NCCRP’ पोर्टलचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

आरोग्य शिबिर व शासकीय लाभ वाटप
माहेर संस्था (खेडशी) आणि भारतीय कष्टकरी सेवा संस्था (भाकर, कोंड्ये, लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह व नेत्र तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान गटई कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी सुवर्णा शांताराम कदम यांना गटई स्टॉल व धनादेशाचे वाटप करण्यात आले.

ज्येष्ठांचा सन्मान हीच आपली संस्कृती
सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी प्रास्ताविक करताना सामाजिक न्याय विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या समृद्ध अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग भावी पिढीने देशाच्या प्रगतीसाठी करून घेतला पाहिजे आणि ज्येष्ठांचा सन्मान राखणे हीच आपली संस्कृती असल्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत आशिष कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी गजानन भरणकर, सिद्धार्थ कांबळे, सुरेश कांबळे, रमेश महादे, मनोहर आलीम, सी. डी. गायकवाड, एल. व्ही. पवार, रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सामाजिक न्याय भवन व जिल्हा जात पडताळणी समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button