
लो. टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयात दोन दुर्मिळ तुताऱ्या दाखल
तांब्याच्या तुताऱ्यांसह वैशिष्ट्यपूर्ण पितळी लाटण्याचीही भर
चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहात आणखी तीन दुर्मिळ वस्तूंची भर पडली आहे. खेड तालुक्यातील सातवीण, देऊळवाडी येथील चंद्रकांत गणपत पाटील यांनी दोन तांब्याच्या तुताऱ्या आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पितळी लाटणे संग्रहालयाला भेट दिले.
सामान्यतः तुतारी पितळी धातूपासून बनविलेली आढळते. मात्र, पाटील यांनी दिलेल्या दोन्ही तुताऱ्या तांब्याच्या असून, त्यांच्या दुर्मिळतेमुळे त्यांना विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण जीवन, लोकपरंपरा आणि जुन्या वाद्यसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वस्तू महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
खड्यांमुळे लाटण्यातून निर्माण होतो लयबद्ध आवाज
पाटील यांनी दिलेले पितळी लाटणे हेही संग्रहालयातील लक्षवेधी वस्तू ठरले आहे. हे लाटणे आतून पोकळ असून त्यामध्ये लहान-लहान खडे भरलेले आहेत. पोळी लाटताना हे खडे एकमेकांवर आदळून विशिष्ट लयबद्ध आवाज निर्माण करतात. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकातील वस्तूला एक आगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही दोन सुरेल मृदंग संग्रहालयाला भेट दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंच्या संग्रहात सातत्याने भर पडत आहे.
या वस्तू संग्रहालयाला मिळवून देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील पूर गावचे शांताराम सोमा झेपले यांनी विशेष प्रयत्न केले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्यवाह विनायक ओक यांनी या वस्तू स्वीकारल्या. यावेळी त्यांनी पाटील आणि झेपले यांना संग्रहालयातील विविध ऐतिहासिक वस्तूंची माहिती देऊन त्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
नवीन वस्तूंमुळे संग्रहालयातील ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि जुन्या जीवनपद्धतीचे दर्शन घडविणाऱ्या संग्रहात महत्त्वपूर्ण भर पडली आहे.




