
भूमिपूजनाला दहा महिने उलटूनही पाचलमधील तीन शासकीय कार्यालयांची कामे ठप्प!
दोन तलाठी कार्यालये आणि एका मंडळ अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात नाही; ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर नागरिकांचा संताप
राजापूर : तालुक्यातील पाचल येथे दोन तलाठी कार्यालये आणि एका मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी जानेवारी २०२६ मध्ये मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. मात्र, या भूमिपूजनाला तब्बल दहा महिने उलटून नोव्हेंबर महिना उजाडला तरी प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तीन शासकीय कार्यालयांच्या इमारतींची एक वीटही रचली गेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील इतर ठिकाणी मंजूर झालेली बहुतांश कार्यालयांची बांधकामे पूर्णत्वाच्या दिशेने असताना पाचलमधील कामे मात्र ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राजापूर तालुक्यात ६१ तलाठी कार्यालये आणि ११ मंडळ अधिकारी कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी बहुतांश ठिकाणची कामे प्रगतिपथावर असताना तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असलेल्या पाचलमध्ये मात्र तीन कार्यालयांच्या बांधकामाबाबत उदासीनता दिसून येत आहे. या कामांचे कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये अपूर्वाताई सामंत यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यामुळे लवकरच या इमारती उभ्या राहतील आणि नागरिकांना शासकीय कामांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलटच असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी कार्यालयांच्या बांधकामाचे मुख्य कंत्राट ‘निर्माण कन्स्ट्रक्शन’ यांच्याकडे, तर मंडळ अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाचे कंत्राट ‘श्रीमाता कन्स्ट्रक्शन’ यांच्याकडे आहे. मात्र, तालुक्यातील काही कामे स्थानिक ठेकेदारांना सबलेट पद्धतीने देण्यात आल्याची चर्चा असून, पाचल येथील कामाची जबाबदारीही एका स्थानिक ठेकेदाराकडे सोपविण्यात आल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, जून २०२५ मध्येच जुन्या इमारतीचे निर्लेखन करून बांधकामासाठी जागा मोकळी करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये भूमिपूजन झाले. तसेच टाईप प्लॅनमध्ये आवश्यक बदल करून तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही प्रत्यक्ष बांधकाम सुरू न होण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या कामांच्या सद्यस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून विचारणा केली जाते, तेव्हा संबंधित ठेकेदाराकडून विविध तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही कामाला सुरुवात न होणे ही बाब निश्चितच गंभीर आहे. शासनाचा निधी उपलब्ध असताना आणि बांधकामासाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना कामे रखडण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, एवढा मोठा कालावधी उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारांवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठेकेदारांच्या कामातील दिरंगाईकडे विभागाचे दुर्लक्ष का होत आहे? कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत का? कार्यारंभ आदेशानुसार कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई का करण्यात आलेली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नेमका काय समन्वय आहे, याबाबतही नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पाचल ही राजापूर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून, परिसरातील अनेक गावांचा प्रशासकीय आणि व्यावसायिक संपर्क या गावाशी आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी दोन तलाठी कार्यालये आणि मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम रखडणे ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून नागरिकांच्या सुविधांशी संबंधित बाब आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कामाच्या विलंबाची कारणे स्पष्ट करावीत, संबंधित ठेकेदारांना जाब विचारावा आणि तिन्ही कार्यालयांची बांधकामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी पाचल परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
भूमिपूजन करून केवळ दहा महिने उलटले नाहीत, तर शासनाच्या विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन ठेकेदारांच्या दिरंगाईवर ठोस कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.




