
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजिंगमध्ये एका तरुणीची हत्याप्रकरणी आरोपीची ओळख पटवण्यात यश मात्र आरोपीच्या अटकेबाबत संभ्रम
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजिंगमध्ये एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण कोकण हादरून गेलं. या घटनेला २४ तास उलटूनही पोलिसांच्या हाती आरोपी लागला की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मध्यरात्री केलेल्या एका पोस्टमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत बौद्ध समाज बांधवांनी आता ‘माणगाव बंद’ची हाक दिली आहे.
लोणेरे येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजवर काल दुपारी एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद आणि विवस्त्र अवस्थेत आढळला. लॉजमधील सफाई कर्मचारी साफसफाईसाठी गेला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत तरुणी ही माणगाव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असून तिचे एका मुस्लिम तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते दोघेही लॉजवर वास्तव्यास होते, मात्र आरोपी तरुणाने तिची हत्या करून तिथून पळ काढला.
अट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात केवळ हत्येचाच नाही, तर बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आणि आरोपीची ओळख पटवण्यात यश आले असून पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत.
पोलिसांच्या संथ कारभारामुळे बौद्ध समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि ‘माणगाव बंद’ पुकारण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी सांगितले की, लॉजिंगमधील सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टरमधील नोंदी तपासल्या जात आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील. मात्र, जोपर्यंत आरोपी प्रत्यक्ष समोर येत नाही, तोपर्यंत लोणेरे आणि माणगाव परिसरातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत.
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
ओंकार लॉजमधून फोन आला, महिलेचा मृतदेह सापडला. तात्काळ फॉरेन्सिक टीमही पाठवली, डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपोर्ट देखील तिथे जाऊन तपास करत आहेत. प्राथमिक गुन्हा दाखल करून घेतला आणि पुढील तपास करत आहोत. रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र महिला खोलीत पडलेली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हत्या, लैंगिक अत्याच्यार या कलमांतर्गत आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी पथक यावर काम करत आहे. सीसीटीव्ही लॉजचे बंद होते, आजूबाजूचे सीसीटीव्ही खंगाळण्याचे काम सुरू आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
रायगड जिल्ह्यातील लोणेरे (ता. माणगाव) येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. ही घटना निदर्शनास येताच मी रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांना सदर घटनेची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रायगड पोलीस, मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलीसांच्या संयुक्त पथकाने या घटनेतील आरोपीला अटक केली असून पुढील तपासही जलदगतीने सुरू आहे. घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातूनही पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना तातडीने आवश्यक सहाय्य मिळावे असे निर्देश विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत




