नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षीला ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ने सन्मानित!

💎सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल; डोंबिवली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

💎 संस्थेचे सचिव राजेश आंबेकर आणि निलेश जाधव यांनी स्वीकारला पुरस्कार

रत्नागिरी : ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी (जि. रत्नागिरी) या संस्थेला प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या वतीने आयोजित ‘युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६’ या कार्यक्रमात नवनिर्मिती फाउंडेशनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशनजवळ, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे येथे आयोजित शानदार सोहळ्यात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मा. सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सचिव राजेश आंबेकर आणि निलेश जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, रक्तदान तसेच सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे.

ग्रामीण भागातील गरीब व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने संस्थेमार्फत अंबेड बुद्रुक येथे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल चालविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

याशिवाय गरजू ज्येष्ठ नागरिकांना नियमित धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रक्तदान उपक्रम, आरोग्य शिबिरे, महिला व युवकांसाठी विविध उपक्रम, तसेच आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा माध्यमांतून संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातून सुरू झालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही पावती आहे. हा पुरस्कार केवळ नवनिर्मिती फाउंडेशनचा सन्मान नसून, संस्थेच्या माध्यमातून निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, हितचिंतक आणि सहकार्य करणाऱ्या दात्यांच्या योगदानाचा गौरव आहे.

या राष्ट्रीय पुरस्कारामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार असून, भविष्यातही शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे.
नवनिर्मिती फाउंडेशनच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button