
मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर भीषण हल्ला; शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले!
चिपळूण बसस्थानक परिसरातील घटना; रिक्षाचालक बंड्या झगडे गंभीर जखमी, कराडमध्ये उपचार सुरू
चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील स्वागत रिक्षा स्टॉप येथे गुरुवारी मोकाट बैलाने रिक्षाचालक बंड्या झगडे यांच्यावर हल्ला केला. बैलाने त्यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या कराड येथे उपचार सुरू आहेत.
महिला प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये म्हणून झगडे यांनी बैलाला हटकण्याचा प्रयत्न केला असता बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या छातीला, बरगड्यांना आणि मणक्याला दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर चिपळूण तालुका रिक्षा चालक-मालक संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी झगडे यांची रुग्णालयात भेट घेतली. नगरपालिकेने त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील मोकाट गुरे, गाढवे आणि श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा नगरपालिकेविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.




