
रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद! धान्य सुरू करण्यासाठी ‘हा’ दाखला बंधनकारक; नवे रेशनकार्ड ३० दिवसांत!
रेशनकार्डवरील काही सदस्यांचा पत्ता बदलला किंवा काहींचा विवाह झाला, अशा वेळी रेशनकार्ड विभक्त केले जाते. मात्र, त्यावेळी जुन्या रेशनकार्डवरील धान्य बंद होते. दुसरीकडे, नव्या रेशनकार्डधारकालाही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यांना आता वार्षिक उत्पन्न ४४ ते ५९ हजार रुपये असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडून अर्ज करणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’अंतर्गत शहरातील ५३ हजार आणि ग्रामीण भागातील ४४ हजार लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद झाले आहे. यात सुमारे ३५ हजार जणांनी तीन ते सहा महिने रेशनधान्यच घेतले नसल्याने त्यांचे धान्य आपोआप बंद झाले आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थीही आहेत.
दरम्यान, रेशनधान्यासाठी शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुखाचे (ग्रामीण भाग) वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपये असणे बंधनकारक आहे. तसेच, शहरातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. आता रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कामगारांचे वार्षिक उत्पन्न एक लाखावर आहे, तरीही रेशनधान्यासाठी २०१३ मध्ये ठरलेलीच उत्पन्न मर्यादा ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे लाखो गरजूंचे धान्य बंद होत आहे.
नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी किंवा ज्यांचे रेशनधान्य बंद झाले आहे, त्यांना तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकाचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपये आणि शहरातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपयांपर्यंतच असणे आवश्यक आहे. ‘अंत्योदय’चे रेशनकार्ड काढणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.




